दिल्लीचे माजी विधिमंत्री सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध त्यांच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदविल्यानंतर गुरुवारी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी भारती यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.
भाजपच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी मालवीयनगर येथील भारती यांच्या निवासस्थानी निदर्शने केली आणि या प्रकाराची सविस्तर चौकशी व्हावी, अशी मागणी केली. सत्तारूढ आपचे वर्तन अराजकासदृश असल्याचा आरोप दिल्ली भाजपचे प्रमुख सतीश उपाध्याय यांनी केला. आपल्याला दिल्लीच्या विकासात स्वारस्य नाही, असेही उपाध्याय म्हणाले.
सोमनाथ भारती यांनी आपल्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला असता महिलांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सोमनाथ भारती यांच्याकडून आपला आणि मुलांचा मानसिक व शारीरिक छळ होत असून भारती व त्यांच्या समर्थकांकडून आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार लिपिका भारती यांनी बुधवारी दिल्ली महिला आयोगाकडे केली.