लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत पहिल्यांदाच खासदार झालेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. गटारं आणि शौचालंय साफ करण्यासाठी मी खासदार झालेले नाही असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं आहे. दरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी प्रज्ञासिंह ठाकूर केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तसंच प्रज्ञासिंह ठाकूर यांना अशी वक्तव्यं करु नका असं फटकारलं आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भोपाळमध्ये काही भाजपा समर्थकांशी संवाद साधताता म्हटलं होतं की, “आम्ही तुमची गटारं स्वच्छ करण्यासाठी निवडून आलेलो नाही…तुमची शौचालय साफ करण्यासाठी खासदार झालेलो नाही. हे समजून घ्या. ज्या कामासाठी आम्ही निवडून आलो आहोत ते आम्ही प्रामाणिकपणे करु. मी हे आधीही सांगितलं आहे आणि आता पुन्हा सांगत आहे”.

खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचे काम पंतप्रधान मोदींच्या विरोधात : ओवेसी

गटारं आणि शौचालयं साफ करण्यासाठी खासदार झाले नाही: साध्वी प्रज्ञा

अनेकांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं हे वक्तव्य नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाची खिल्ली उडवणारं असल्याचं म्हटलं होतं. तुम्हाला स्वच्छता करायची नाही तर करु नका पण असे शब्द वापरुन विरोधकांना मोदी सरकारवर टीकेची संधी देऊ नका असे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. तुम्ही आम्हाला मूर्ख बनवण्यासाठी खासदार झाला आहात का? असाही प्रश्न काही नेटकऱ्यांनी विचारला आहे.

एका भाजपा कार्यकर्त्याने आपल्या परिसरात स्वच्छता नसल्याची तक्रार केल्यानंतर प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हे वक्तव्य केलं होतं. महत्त्वाचं म्हणजे प्रज्ञासिंह ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. नथुराम गोडसे देशभक्त असल्याचं वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपण याबद्दल त्यांना कधीच माफ करु शकणार नाही असंही म्हटलं होतं.