पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागलेल्या भाजपा युवा मोर्चाच्या महिला नेत्याकडे अमली पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. या महिला नेत्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी भाजपाच्या माहिला नेत्याला १०० ग्राम कोकीनसहीत अटक केली आहे. भाजपाच्या या महिला नेत्याचे नाव पामेला गोस्वामी असं आहे. पामेला गोस्वामीसोबतच तिचा सहकारी प्रबीर डे यालाही अटक करण्यात आलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पामेला गोस्वामी कोकीन घेऊन आपल्या कारमधून जात असतानाच पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलं. पोलिसांनी तिला कोकीन पुरवणाऱ्या प्रबीर डे यालाही अटक केलीय. प्रबीरला कोलकात्यामधील अलीपुर येथील एनआर अॅव्हेन्यू येथून अटक करण्यात आलीय. पामेलाला अटक करण्यात आली तेव्हा तिच्यासोबत कारमध्ये तिचा एक सुरक्षारक्षकही होता.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पामेला बऱ्याच काळापासून अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा संक्षय पोलीस अधिकाऱ्यांना होता. पामेला अनेकदा एका ठिकाणी थांबायची आणि याच ठिकाणी कोकीनची तस्करी केली जायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पामेला मागील बऱ्याच काळापासून अमली पदार्थांच्या तस्करी संदर्भातील कामामध्येही सहभागी होती. १९ फेब्रुवारीला पोलिसांना काही सुत्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकण्यात आला. तेव्हा पामेलाकडे अमली पदार्थ सापडले. विशेष म्हणजे पामेला राजकारणामध्ये सक्रीय असल्याने तिला सुरक्षाही पुरवण्यात आलेली. जेव्हा पामेलाला अटक करण्यात आली तेव्हा तिच्यासोबत सुरक्षारक्षकही होता.
अमली पदार्थांच्या सध्याच्या किंमतीनुसार जप्त करण्यात आलेले कोकीन हे पाच लाख रुपयांचे आहे. पोलीस सध्या पामेलाची चौकशी करत आहे. पोलीस पामेलाला आज न्यायालयासमोर हजर करणार आहे. त्यानंतर पोलीस पामेलाच्या कोठडीसाठी मागणी करणार असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. अमली पदार्थांच्या या रॅकेटमध्ये नक्की कोणकोणते लोकं आहेत हे जाणून घेण्याच्या दृष्टीने पोलीस तपास करणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2021 8:25 am