पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीच्या वर्षपूर्तीनिमित्त (३० मे) भाजपने ७५० आभासी सभा (व्हर्च्युअल रॅली) तसेच, १ हजार पत्रकार परिषदा घेणार आहे. या जनसंपर्क मोहिमेची तयारी करण्याचे आदेश पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा फेसबुक लाइव्हद्वारे कार्यकर्ते व पक्ष समर्थकांशी संवाद साधतील. प्रत्येक बुथवर व्हॉट्स अ‍ॅप ग्रूप तयार करण्यास सांगण्यात आले असून २७ ते २९ मे या तीन दिवसांत त्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. विशेष डिजिटल माहितीपत्र प्रसिद्ध केले जाणार आहे.

या मोहिमेअंतर्गत भाजपने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची माहिती तसेच, त्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचले जाणार आहे. किमान १० कोटी घरांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

२० लाख कोटींची आर्थिक मदत, राम मंदिर निर्माण, अनुच्छेद ३७०, तिहेरी तलाकचा कायदा, नागरिकत्व दुरुस्ती कायदा आदींची माहिती दिली जाईल. करोनाच्या काळात पंतप्रधान मोदींनी घेतलेले निर्णय आणि आर्थिक मदतीवरही भर दिला जाणार आहे. यासंदर्भात पक्षाचे महासचिवव अरुण सिंह यांनी सोमवारी देशभरातील पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.

पक्ष कार्यकर्त्यांना नियंत्रित विभाग, विलगीकरण केंद्रे व सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. अन्य ठिकाणी फिरून कार्यकर्ते लोकांना विषाणूरोधक, मास्कवाटप करतील. राष्ट्रीय व प्रादेशिक नेतृत्व मोठय़ा राज्यांमध्ये किमान दोन तरी आभासी सभा घेईल.