राजस्थानच्या अलवर येथील भाजपाचे आमदार बनवारी लाल सिंघल यांनी मेओ मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त भाष्य केलं आहे. मी त्यांच्याकडे कधीच मत मागायला जात नाही आणि जाणारही नाही असं ते म्हणाले आहेत. मेओ मुस्लिम समाजाचे जास्तीत जास्त लोकं गुन्हेगारीमध्ये अडकलेले असतात. या समाजाचे लोकं हिंदू तरुणींना फसवतात आणि लव जिहादच्या मार्गे त्यांच्याशी लग्न करतात, असं ते म्हणाले आहेत.

मी माझ्या घरात मेओ मुस्लिमांना कधी येऊ देत नाही किंवा त्यांच्याकडे कधी मतंही मागत नाही असं ते अलवारमध्ये एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे. त्यांच्या या विधानावर पत्रकारांनी कार्यक्रम संपल्यावर प्रश्न विचारला असता सिंघल हे आपल्या विधानावर ठाम राहिले. हे राजकारण नाहीये, माझं ठाम मत आहे की अलवार जिल्ह्यातील जवळपास सर्वच गुन्ह्यात मेओ मुस्लिमांचा समावेश असतो. जमिनीवर अनधिकृतरित्या कब्जा करणं असो किंवा हिंदू मुलींना फसवून लव जिहादच्या मार्गे त्यांच्याशी लग्न करणं असो, मी अशा समाजाकडून कधीच मत मागितलं नाही आणि यापुढेही कधीच मागणार नाही. कारण जर मी त्यांच्याकडे मत मागितलं तर त्यांना गुन्ह्यांमधून आणि कायदेशीर कारवाईपासून सोडवणं माझं कर्तव्य बनेल असं ते म्हणाले.

अलवार लोकसभा क्षेत्रात मेओ मुस्लिमांची संख्या जवळपास साडेतीन लाख आहे, आणि जानेवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाचा येथे जवळपास दोन लाखांनी पराभव झाला होता.