News Flash

..अखेर अडवाणींचे भाषण झाले नाही!

भाजपमध्ये दुर्लक्षित होत असलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाषण न झाल्यामुळे सत्ताधारी पक्षातील सध्याच्या सत्तासमीकरणाचे प्रतिबिंब उमटल्याचे दिसून आले. पक्षाच्या

| April 5, 2015 03:58 am

भाजपमध्ये दुर्लक्षित होत असलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाषण न झाल्यामुळे सत्ताधारी पक्षातील सध्याच्या सत्तासमीकरणाचे प्रतिबिंब उमटल्याचे दिसून आले. पक्षाच्या स्थापनेपासून असे प्रथमच झाले आहे.
शनिवारी संपलेल्या या बैठकीत अडवाणी यांनी भाषण का केले नाही याबाबत पक्षाने काहीच उल्लेख केला नाही. परंतु, अडवाणी हे काही कटु बोलतील अशी भीती असलेल्या पक्षनेतृत्वाने त्यांना हे भाषण तपासून घेण्यास सांगितल्यामुळे भाषण करण्यास अडवाणी उत्सुक नव्हते अशी अटकळ बांधण्यात येत होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षाच्या प्रचार समितीचे प्रमुख जाहीर करणाऱ्या गोव्यातील २०१३ सालच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणे अडवाणी यांनी टाळले होते. त्यानंतर पक्षात दुर्लक्ष करण्यात येत असलेले अडवाणी बेंगळुरूतील दोन दिवसांच्या बैठकीत हजर होते.
अडवाणी यांनी बैठकीला संबोधित का केले नाही असे विचारले असता, पक्षाच्या अंतर्गत निर्णयांबाबत आम्ही माध्यमांशी चर्चा करत नाही, असे उत्तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले. माहितीचा अधिकार आणि पारदर्शकतेच्या काळातही आम्ही ही माहिती तुमच्यासोबत ‘शेअर’ करू शकत नसल्याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले. अडवाणी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांची इच्छा असेल तेव्हा कुठल्याही व्यासपीठावरून ते पक्षाला मार्गदर्शन करू शकतात, असे सांगून जेटली यांनी या मुद्दय़ाला फारसे महत्त्व दिले नाही. आम्ही जी काही व्यवस्था करतो, त्याचा निर्णय एकत्रितपणे घेतो, असे ते म्हणाले.
१९९०च्या दशकात भाजपचा अभ्युदय साधणारे अडवाणी यांचे नरेंद्र मोदी यांच्याशी मधुर संबंध नाहीत. मोदी यांना प्रचारसमितीचे प्रमुख  पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्यास अडवाणी यांनी विरोध दर्शवला होता.
‘काँग्रेसमुक्त भारत’च्या लक्ष्याकडे वाटचाल -सीतारामन
पक्षाने निश्चित केलेल्या ‘काँग्रेसमुक्त भारत’चे लक्ष्य पूर्ण करण्याकडे भाजपची हळूहळू वाटचाल सुरू असून, काँग्रेसने निर्माण केलेले ‘विश्वासार्हतेचे संकट’ भाजपने परिणामकारकरीत्या हाताळले असल्याचे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे.भाजपने निवडणूक प्रचारात दिलेला ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा टप्प्या-टप्प्याने व निश्चितपणे प्रत्यक्षात येत आहे. काँग्रेसने निर्माण केलेले विश्वासार्हतेचे संकटही परिणामकारीत्या दूर करण्यात येत असून लोक भाजपकडे आशेने पाहत आहेत, असे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी पक्षाच्या कार्यकारिणीने संमत केलेल्या राजकीय ठरावाबाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितले. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ चा नारा प्रचारात आणल्यानंतर पक्षाला  विजय मिळाला होता. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांतही पक्षाला यश मिळाले. ‘काँग्रेस-मुक्त’ हे केवळ निवडणुकीपुरते आकलन नसून, त्या दुर्दैवी कालावधीत देशात बळावलेली वृत्ती होती. काँग्रेसच्या कार्यकाळात गरिबीचे सक्षमीकरण करण्यात येत होते, तर भाजपचा गरिबांचे सक्षमीकरण करण्यावर विश्वास आहे असे त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2015 3:58 am

Web Title: bjps bangalore meet concludes without speech by its margadarsi l k advani
टॅग : L K Advani
Next Stories
1 मुस्लिमांइतकीच मुले जन्माला घालावीत
2 ‘स्वराज संवाद’वरून आपमध्ये संघर्ष
3 ‘गोध्रा दंग्याचे उत्तर भाजपने द्यावे’
Just Now!
X