गेल्या दहा वर्षांतील केंद्रातील कारभारबद्दल कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे दोघेही समानपणे जबाबदार असल्याचा आरोप करीत यूपीए सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अभिनव ‘आरोपपत्रात’ केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने यूपीए सरकारविरोधात हे आरोपपत्र प्रसिद्ध केले आहे.
भाजपचे नेते रविशंकर प्रसाद, मुख्तार अब्बास नक्वी, निर्मला सिथारामन आणि आरती मेहरा यांच्या हस्ते या आरोपपत्राचे दिल्लीत प्रकाशन करण्यात आले. गेल्या दहा वर्षांतील केंद्रातील यूपीए सरकारचा कारभार म्हणजे सर्वच आघाड्यांवर अपयश असल्याची टीका आरोपपत्रात करण्यात आली आहे. यूपीए सरकारच्या आर्थिक धोरणामधील कमतरतेवर भाजपने या आरोपपत्रात नेमकेपणाने बोट ठेवले आहे. यूपीएच्या आर्थिक धोरणांमुळे देशाचे नुकसान झाले. संरक्षण, परकीय धोरण यासारख्या महत्त्वाच्या विषयांकडे यूपीएने लक्षच दिले नाही, असाही आरोप यामध्ये करण्यात आला आहे. यूपीए सरकारच्या कारभारामुळे पंतप्रधान कार्यालयाचा सन्मानही खालावल्याचा आरोप करण्यात आला आहे.