प्रजासत्ताक दिनाच्या मोदी सरकारच्या वादग्रस्त जाहिरातीचे प्रकरण ताजे असतानाच दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आणखी एक वादग्रस्त जाहिरात दिल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीत येत्या ७ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीचे मतदान होत असून त्यासाठीच्या पक्ष जाहिरातीत भाजपने काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर टीका करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या फोटोला पुष्पहार घातल्याचे दाखवले आहे. आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या जाहिरातीचा निषेध व्यक्त केला असून भाजपने याबद्दल जाहिर माफी मागावी अशी मागणी केली आहे.
जाहिरातीत अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेससोबत लग्न केल्याचे दाखवण्यात आले असून यात ते त्यांच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेऊन शपथ घेताना दिसत आहेत. या चित्रात भिंतीवर अण्णा हजारेंचा फोटो असून या फोटोला हार घालण्यात आला आहे. केजरीवाल यांनी अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांनी मुलांची शपथ घेत काँग्रेस आणि भाजपासोबत जाणार नाही असे म्हटले होते. मात्र सत्तास्थापनेसाठी केजरीवाल यांना अखेर काँग्रेसचाच आधार घ्यावा लागला होता. भाजपाने या जाहिरातीमधून याच मुद्द्यावर केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. मात्र टीका करताना अण्णा हजारेंच्या फोटोला हार घालून भाजपाने वाद ओढावून घेतला आहे.