‘देशाच्या सुरक्षेला पाकिस्तान आणि चीनपासून धोका आहे. सीमा भागात या दोन्ही देशांकडून सातत्याने कुरापती काढल्या जात असतात. मात्र केंद्रातील सत्ताधारी सरकार हातावर हात ठेवून बसले आहे. दोन्ही देशांना सडेतोड उत्तर देण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे. नेतृत्वबदलाची हाक देण्यासाठीच ही आजची सभा आहे..’ अशा शब्दांत गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत माजी सैनिकांना संबोधित केले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित झाल्यानंतर रविवारी नरेंद्र मोदी यांनी प्रथमच जनसभा घेतली. हरियाणातील रेवडी येथे माजी सैनिकांच्या मेळाव्यात त्यांनी देशाच्या सध्याच्या संरक्षण पद्धतीवर भाष्य केले. ६ ऑगस्टला पाकिस्तानी सैन्याने भारतीय हद्दीत घुसून पाच भारतीय जवानांची हत्या केल्याच्या प्रकरणावरून मोदी यांनी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांना पुन्हा टीकेचे लक्ष्य केले. पाकिस्तानी सैन्याच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्याऐवजी आपले संरक्षणमंत्री पाकिस्तानी सैन्याची पाठराखण करण्यासारखेच वक्तव्य करत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे सीमेवर तैनात असलेल्या जवानांनाही प्रचंड वेदना झाल्या असतील, असे मोदी म्हणाले.
धर्मनिरपेक्षतेचे मूर्तिमंत प्रतीक
केंद्र सरकारवर दुगाण्या झाडल्यानंतर मोदींनी ही आजची सभा केंद्रातील नेतृत्वबदलासाठीची हाक असल्याचे स्पष्ट केले.  भारतीय लष्कर हे धर्मनिरपेक्षतेचे मूर्तिमंत प्रतीक असून राजकारण्यांनी त्यापासूनच खरा धडा घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले. माजी सैनिकांच्या या मेळाव्याला माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग हेही उपस्थित होते.
सरकारचा थंडपणा
पाकिस्तानी सैन्याकडून दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असते, तर तिकडे चीन ब्रह्मपुत्रेचे पाणी अडवून अरुणाचलचा घास घेण्यास आतुर आहे. त्यांचे सैनिकही दररोज घुसखोरी करत आहेत. अशी सर्व बाजूंनी भीषण परिस्थिती असताना केंद्रातील सरकार मात्र ‘अशा गोष्टी होतच असतात’, असे म्हणत थंड बसून आहे हे चीड आणण्यासारखेच असल्याचे मोदी म्हणाले.
‘भाजपची राजकीय’ आत्महत्या
देशाच्या जनतेने अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांसारख्या नेत्यांना नाकारले आहे, असे असताना भाजपने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींची उमेदवारी घोषित करून राजकीय आत्महत्या केली असल्याची खोचक टीका काँग्रेसने केली आहे.