नरेंद्र मोदींनी आजपासून पाच वर्षांपूर्वी देशातील अनेक प्रस्थापित पक्षांची कार्यपद्धती नष्ट करत भाजपाला नवसंजीवनी मिळवून दिली. १६ मे २०१४ रोजी देशाच्या राजकारणात मोठा बदल घडला, जेव्हा भगव्या लाटेखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने लोकसभा निवडणूकीत तब्बल ३३६ जागा मिळवत देशाची सत्ता ताब्यात घेतली.

भाजपाने २०१४ ची निवडणूक अनेक आकर्षक नारे देत जिंकली. ज्याद्वारे काँग्रेसला लक्ष्य केले गेले आणि देशभरातील जनतेला विकासाचे नवे युग व अच्छे दिन दाखवण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसच्या ‘हर हाथ शक्ती, हर हाथ तरक्की’ या नाऱ्याला प्रत्युत्तर देत भाजपाकडून नरेंद्र मोदींना केंद्रस्थानी ठेवत ‘अबकी बार मोदी सरकार’ चा नारा दिला गेला.

२०१४ मध्ये  प्रभावशाली ठरलेल्या काही घोषणा –
‘अबकी बार मोदी सरकार’ या टॅगलाइनखाली बहुत हुआ किसानो पे अत्याचार अबकी बार मोदी सरकार अशा लक्षवेधी घोषणा देण्यात आल्या. सर्वप्रकारची वृत्तपत्रे, टीव्हीवरील जाहीरातींसह अन्य प्लॅटफॉर्मवर मोदींसह भाजपचे ज्येष्ठ नेते आडवाणी, अमित शाह आणि इतर नेत्यांनीही या घोषणांचा जोरदार प्रचार केला. सामान्य नागिरकांनी देखील आपल्या स्वतःच्या घोषणांमध्ये ‘अबकी बार मोदी सरकार’चा समावेश केल्याने ही अधिकचा लोकप्रिय झाली. या टॅगलाइनचा प्रभाव अमेरिकेच्याही राजकारणात दिसून आला. कारण, वर्षभरानंतरच अमेरिकेत सत्तेत आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील अमेरिकेतील भारतीयांना आकर्षित करण्यासाठी ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ अशी घोषणा तयार केली होती.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या १९९६ मधील ‘सबको देखा बारी बारी, अबकी बारी अटल बिहरी’ या घोषणेपासून प्रेरणा घेऊन मोदींची ‘अबकी बार मोदी सरकार’ ही घोषणा तयार करण्यात आली होती. मोदींचा हा प्रचार कार्यक्रम ‘ऑगिलव्ही अॅण्ड माथर’ या जाहिरात एजन्सीने तयार केला होता.

२०१४ मध्ये भाजपाने काँग्रेसमुक्त भारताची प्रथमच घोषणा केली होती. तसेच, नव मतदारांना नव्या भारताची आशा दाखवत ‘अच्छे दिन आने वाले है’ या घोषणेचाही प्रभावीपणे वापर करण्यात आला. या तुलनेत काँग्रेसची ‘कट्टर सोच नही युवा जोश’ ही घोषणा प्रभाव टाकू शकली नाही. यानंतर आलेली मोदींची ‘हर घर मोदी, जन जन मोदी’ ही घोषणा टीकेची धनी ठरली कारण याद्वारे मोदी स्वतःची तुलना देवाशी करत असल्याचा विरोधकांनी प्रचार केला. तर २०१४ मधील भाजपाची ‘सबका साथ सबका विकास’ ही घोषणा आजही प्रचारात आहे. २०१९ च्या निवडणूकीतही याचा फायदा करून घेण्याचा भाजपचा मानस आहे.