भाजपच्या पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक डिसेंबर महिन्यात होईल, अशी माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपमध्ये ‘एक व्यक्ती एक पद’ हा नियम कटाक्षाने पाळला जातो. विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा केंद्रीय गृहमंत्री झाल्यामुळे अध्यक्षपद शहा यांच्याकडेच कायम राहते, की भाजप नवा राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त करेल याबाबत उत्सुकता आहे. दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी भाजपने कार्यकारी अध्यक्षपद निर्माण करून  नड्डा यांच्याकडे सूत्रे दिली आहेत.

भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुका १० ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. बूथ स्तरावरील निवडणूक १० ते ३० ऑक्टोबर या काळात होईल. नोव्हेंबरमध्ये जिल्हा आणि राज्य स्तरावर निवडणूक होऊन प्रदेशाध्यक्ष, संघटनाप्रमुख तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जातील, असेही नड्डा यांनी सांगितले.

भाजपने जुलैमध्ये सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेद्वारे ७ कोटी नवे सदस्य भाजपला मिळाले असून पक्षाची एकूण सदस्यसंख्या १८ कोटी झाली आहे. २.२ कोटी सदस्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, सदस्य नोंदणी मोहीम अपेक्षापेक्षाही जास्त यशस्वी झाली आहे. जम्मू-काश्मीर, प. बंगाल आदी राज्यांमध्ये भाजपचा विस्तार झाला नव्हता. या नोंदणी मोहिमेमुळे या राज्यांमध्येही भाजपला मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचा दावा नड्डा यांनी केला.