कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा आणि यादी जाहीर होण्याबरोबरच नाराजीचे सत्रही सुरू झाले आहे. इच्छुकांबरोबर त्यांच्या समर्थकांच्या नाराजीला काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना सामोरे जावे लागत आहे. कर्नाटकमधील कलबुर्गी (गुलबर्गा) येथे उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपाचे नेते शशील नामोशी यांनी माध्यमासमोरच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. नामोशी अक्षरश: धाय मोकलून रडत होते. अखेल पत्रकार परिषद आवरती घेऊन नामोशी यांना सावरावे लागले.

कलबुर्गीमधून उमेदवारी मिळेल या आशेवर भाजपा नेते शशील नामोशी होते. पण जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा नामोशींना मोठा धक्का बसला. पक्षाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नामोशींचे नाव वगळण्यात आले. हा धक्का नामोशींना सहन झाला नाही. त्यांनी माध्यम प्रतिनिधींना पत्रकार परिषदेसाठी बोलावले. आपलं म्हणणं माध्यमासमोर मांडत असताना नामोशींच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांना रडू कोसळलं. समर्थकांना नामोशींना आवरणं कठीण गेलं. अखेर पत्रकार परिषद अर्धवट सोडून त्यांना तेथून घेऊन जावं लागलं.

तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना नामोशी म्हणाले, मी अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत होतो. जेव्हा मला समजलं की यादीत माझं नाव नाही, तेव्हा मी अस्वस्थ झालो. असं का झालं, हे मला माहीत नाही. पण यामुळं मला खूप दु:ख झालं आहे. यावेळी नामोशींना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे समर्थकांनी पक्षविरोधात घोषणाबाजी केली.

दरम्यान, कर्नाटकात भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात नाराजीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. एकीकडे उमेदवारी नाकारल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली तर दुसरीकडे भाजपाच्या ८२ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीनंतर मोठा गोंधळ उडाल्याचे दिसते.