सामाजिक समरस्ता उपक्रमाअंतर्गत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी आदिवासी कुटुंबाच्या  घरी जाऊन भोजन केले. मात्र या कुटुंबाच्या घरात शौचालय नसल्याचे उघड झाल्याने अमित शहा आणि भाजपवर टीका करण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये ही परिस्थिती असल्याचे सांगत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानावरच प्रश्न उपस्थित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमित शहा हे मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असून रविवारी दुपारी शहा, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, मध्य प्रदेशचे प्रभारी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, पक्षाचे महामंत्री अनिल जैन आणि प्रदेशाध्यक्ष नंदकुमारसिंह चौहान हे भोपाळमधील सेवनिया गौड येथे राहणाऱ्या कमलसिंह उइके या आदिवासी कुटुंबाच्या घरी गेले. शहा आणि अन्य नेत्यांनी कमलसिंह यांच्या घरी जमिनीवर बसून भोजन केले. कमलसिंह कुटुंबाने पाहुण्यांसाठी जेवणाचा खास बेत आखला होता. शहा यांना डालबाटी, चूरमा, भात, वांग्याचे भरीत आणि पारंपारिक गोड पदार्थ खाऊ घातले असे कमलसिंह कुटुंबाने सांगितले.

‘देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या घरी भोजनासाठी आले ही अभिमानाची गोष्ट आहे’ असे कमलसिंह यांनी सांगितले. पण प्रसारमाध्यमांशी बोलताना कमलसिंह यांनी घरात शौचालय नसल्याचे सांगितले. ‘मी मेहनत करुन उदरनिर्वाह करतो. माझ्या कुटुंबात नऊ जण असून कुटुंबात तीन लहान मुले आहेत. आमच्या घरात शौचालय नसून आम्ही उघड्यावरच शौचासाठी जातो’ असे त्यांनी सांगितले. ‘मी शौचालयासाठी अर्ज केला असून अद्याप काम सुरु झालेले नाही’ असे त्यांनी नमूद केले.

काँग्रेसने यावरुन भाजप सरकारवर टीका केली. मोदींच्या स्वच्छ भारत अभियानावरही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. ‘स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत भाजपने मध्य प्रदेशमध्ये १४३ शहर, १७ हजार गावे आणि ११ जिल्हे हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली होती. यात भोपाळ जिल्ह्याचाही समावेश होता. त्यामुळे ही आकडेवारी फसवी आहे की काय?’ असा प्रश्न मध्य प्रदेशमधील विरोधी पक्षनेते अजय सिंह यांनी उपस्थित केला.

दुसरीकडे वाद निर्माण होताच भोपाळच्या महापौरांनी प्रतिक्रिया दिली. भोपाळ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मी माहिती मागवली आहे असे त्यांनी सांगितले. तर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम पी सिंह यांनी कमलसिंह यांच्या घराची पाहणी करण्यासाठी एक पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps tribal worker at whose house party chief amit shah had lunch dont have toilet congress slams modi government
First published on: 21-08-2017 at 09:08 IST