इतर राज्यांबरोबरच उत्तर प्रदेशवरही करोनाचा परिणाम झाला आहे. रुग्णांची संख्या काळजी वाटावी अशी नसली तरी राज्याचं अर्थचक्र लॉकडाउनमुळे अडकून पडलं आहे. त्यामुळे योगी आदित्यानाथ सरकारकडून महसूलाच्या वेगवेगळ्या मार्गांची चाचपणी सुरू आहे. त्यात काही व्यवहार सुरू करण्यालाही सरकारनं परवानगी दिली असून, यावरून भाजपाचेच खासदार डॉ. साक्षी महाराज यांनी योगी आदित्यनाथ सरकारला सवाल केला आहे.
देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये करोनानं शिरकाव करण्यास सुरूवात केल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाउनच्या निर्णय लागू होऊन तब्बल ४२ दिवस लोटले आहेत. याचा परिणाम करोनाच्या प्रसारावर झाला आहे. पण, त्याचे आर्थिक दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार बंद ठेवल्यानं सरकारच्या महसूलावर प्रचंड परिणाम झाला आहे.
लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाल्यानंतर अनेक राज्यांनी शिथिलता देण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकानं खुली करण्यासही परवानगी दिली. यात मद्यासह धुम्रपानाच्या दुकानांचाही समावेश आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर भाजपाचे खासदार डॉ. साक्षी महाराज यांनी टीका केली आहे. “लॉकडाउन जनतेचा जीव वाचवण्यासाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहे. मग मद्य, बिडी, सिगारेट, गुटका, पान आदी व्यसनांच्या विक्रीला यातून सूट कशासाठी?,” असा सवाल त्यांनी केला आहे.
लॉक डाउन जनता के जीवन रक्षा और बढ़िया स्वास्थ्य के लिए है।
तो फिर शराब,बीड़ी,सिगरेट, गुटका,पान पराग आदि नशीले पदार्थो पर छूट क्यों ?— Dr.Sakshi Ji Maharaj (@drsakshimaharaj) May 6, 2020
उत्तर प्रदेशात करोनामुळे फारशी चिंताजनक स्थिती नाही. उत्तर प्रदेशात सध्या करोनाग्रस्तांची संख्या २ हजार ८५९ इतकी आहे. तर ५३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. योगी आदित्यानाथ सरकारनं दुसऱ्या राज्यात अडकलेल्या कामगारांनाही परत आणण्याचं काम सुरू केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 7, 2020 1:30 pm