कर्नाटकातील १५ बंडखोर आमदारांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? याकडे मंगळवारी सगळयांचे लक्ष लागलेले असताना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि कर्नाटक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा रिलॅक्स मूडमध्ये होते. पक्षाच्या आमदारांना ज्या रिसॉर्टमध्ये ठेवले आहे तिथे येडियुरप्पा आमदारांसोबत क्रिकेट खेळत होते.

कर्नाटकात सत्तास्थापनेची रणनिती ठरवण्यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी मंगळवारी बराचसा वेळ येलहंकाजवळच्या रिसॉर्टमध्ये घालवला. येडियुरप्पा येथे पक्षाचे आमदार रेणुकाचार्या आणि एसआर विश्वनाथ यांच्यासोबत क्रिकेट खेळले. त्यांचे फलंदाजी करतानाचे फोटो कर्नाटक भाजपाच्या मीडिया सेलने जारी केले होते.

कर्नाटकात १६ आमदारांनी राजीनामे दिले आहे. त्यात १३ काँग्रेसचे तर तीन जेडीएसचे आमदार आहेत. एस. शंकर आणि एच नागेश या अपक्ष आमदारांनीही सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.