काळवीट शिकारप्रकरणात अभिनेता सलमान खानकडून दाखल करण्यात आलेल्या अर्जांवर येत्या ३ मार्च रोजी सुनावणी घेण्यात येईल, असे जोधपूर न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सलमान खानला काहीसा दिलासा मिळाला आहे. या सुनावणीनंतरच मूळ विषयावरील अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे. काळवीट शिकारप्रकरणी अंतिम सुनावणी जोधपूरमधील न्यायालयात बुधवारी होणार होती. मात्र, सलमान खानच्या वकिलांनी त्याने न्यायालयाकडे केलेल्या अर्जांवर आधी सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानुसार येत्या तीन मार्चला या अर्जांवर सुनावणी घेण्यात येणार आहे.
काळवीट शिकारप्रकरणी सलमानला दणका, शिक्षेवरील स्थगिती उठवली
काळवीट शिकारप्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाने सलमानच्या शिक्षेला दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली. यामुळे या प्रकरणात सलमानच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. तसेच उच्च न्यायालयाने सलमानच्या याचिकेवर फेरविचार करून निर्णय घ्यावा, असेही आदेश दिले आहेत. सलमानला काळवीट शिकार प्रकरणात राजस्थानमधील कनिष्ठ न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, राजस्थान उच्च न्यायालायने या शिक्षेला स्थगिती दिल्याने सलमानला मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, या निर्णयाविरोधात राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सलमानच्या शिक्षेवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय दिला.