कर्नाटकाच्या दौऱ्यावर असलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दलितांच्या रोषास सामोरे जावे लागले. कलबुर्गी येथील अनुसूचित जातीच्या एका संमेलनात सहभागी झालेल्या शहांना दलित संघटनेने काळे झेंडे दाखवले.

शहा हे शनिवारपासून बीदर, कलबुर्गी आणि यादगीर जिल्ह्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. याचदरम्यान कलबुर्गीतील एनव्ही महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित अनुसूचित जाती संमेलनात प्रवेश करण्यापूर्वी डीएसएस संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शहा यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार काळे झेंडे दाखवणारे कार्यकर्ते केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या संविधान बदलण्याच्या वक्तव्याचा निषेध करत होते. संमेलनात शहा बोलत असताना उपस्थित असलेल्या काही लोकांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली आणि त्यांनी शहांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी त्वरीत १० जणांना ताब्यात घेतले. ही काँग्रेसची संस्कृती आहे. चिंता करू नका, सरकार बदलत आहे, असे शहांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटकात आयोजित एका कार्यक्रमात संविधान बदलण्याची गरज असल्याचे म्हटले होते. वेळोवेळी संविधान बदलले पाहिजे आणि आम्ही हे करण्यासाठीच आलो आहोत.. जे लोक धर्मनिरपेक्ष आणि प्रगतीशील असल्याचा दावा करत आहेत. ते आपले आई-वडिलांची ओळख ठेवत नाहीत. या विधानानंतर त्यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. हेगडेंनी याप्रकरणी संसदेत माफीही मागितली होती. त्यानंतर दलितांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणीही हेगडे अडचणीत आले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काही दलित संघटनांनी राज्यात आंदोलनही केले होते. मला दलितांविषयी काहीही म्हणायचे नव्हते. माझे वक्तव्य बुद्धिजिवांना संबोधून होते. काँग्रेस जाणूनबुजून माझी छबी बिघडवत आहे, असा आरोप हेगडे यांनी केला होता. कर्नाटकात याचवर्षी एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपाकडून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रकार होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कर्नाटकच्या दौऱ्यावर जात आहेत.

दरम्यान, अमित शहा यांनी हेगडे यांच्या वक्तव्याशी पक्षाचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले. हेगडेंनी याप्रश्नी माफीही मागितल्याचे सांगत त्यांनी हा वाद आता संपल्याचे म्हटले.