आपल्या आकाशगंगेच्या टोकाला असलेल्या प्रचंड वस्तुमानाच्या कृष्णविवराचे अवशेष सापडले आहेत. अतिशय वेगाने फिरणाऱ्या वैश्विक मेघाच्या विश्लेषणातून हे शक्य झाले आहे.

तुलनेने शांत कृष्णविवरे शोधली जाण्याची ही सुरू वात आहे. अशी लधावधी कृष्णविवरे आकाशगंगेत असून आतापर्यंत फार थोडी गवसली आहेत. कृष्णविवरे काळी असल्याने व त्यातून प्रकाश बाहेर पडत नसल्याने ती सापडणे अवघड असते.

काही ठिकाणी कृष्णविवरांचे इतर परिणाम दिसत असतात त्यामुळे त्यांचे अस्तित्व शोधणे शक्य असते. जर कृष्णविवराचा सहकारी तारा असेल तर कृष्णविवरात जाणारा वायू त्याच्याभोवती साठतो व त्यामुळे चकती तयार होते. ती तापत जाते याचे कारण गुरूत्वीय ओढ कृष्णविवराकडून जास्त असते, त्यामुळे तीव्र प्रारणे बाहेर पडतात. जर कृष्णविवर अवकाशात एकटेच फिरत असेल तर प्रारणे बाहेर पडत नाहीत, त्यामुळे त्याचे निरीक्षण करणे अवघड असते.

जपानमधील कियो विद्यापीठाचे मासाया यामादा व टोमाहारू ओका यांनी एएसटीइ ही चिलीतील दुर्बीण व नोबेयामा रेडिओ वेधशाळेतील ४५ मीटरची रेडिओ दुर्बीण यांचा वापर करून, सुपरनोव्हाचे अवशेष ‘डब्ल्यू ४४’ च्या आजूबाजूला असलेल्या रेणवीय ढगाचे निरीक्षण केले. ते अवशेष १० हजार प्रकाशवर्षे दूर आहेत.

सुपरनोव्हा स्फोटातून किती ऊर्जा रेणवीय वायूत गेली याचा अदमास घेणे हा याचा उद्देश होता, पण त्यातून डब्ल्यू ४४ च्या कडेला एक कृष्णविवर असल्याचे निष्पन्न झाले आहे. संशोधकांच्या मते रेणवीय ढगाची गती जास्त असून त्याचे नाव ‘बुलेट’ असे आहे. तो सेकंदाला शंभर किलोमीटर वेगाने प्रवास करीत आहे. तो वेग ध्वनीच्या आंतरतारकीय अवकाशातील वेगापेक्षा जास्त आहे. या ढगाचा आकार दोन प्रकाशवर्षे आहे . आपल्या आकाशगंगेत १० कोटी ते १ अब्ज इतकी कृष्णविवरे असण्याची शक्यता असून त्यातील केवळ ६० कृष्णविवरांचा शोध लागला आहे, असे त्यांनी सांगितले.