पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका; सुषमा, वसुंधरांबाबत गप्प का? सोनियांचा सवाल

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रतिहल्ला चढविला. काळ्या पैशांबाबत केंद्र सरकारने ठोस भूमिका घेतली, त्यामुळे घोटाळेबाज आता बिथरले असून, त्यांनी सुधारणांच्या कार्यक्रमात खोडा घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप मोदी यांनी केला.

नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने म्हणजे पोकळ गोष्टी होत्या, अशी टीका सोनिया गांधी यांनी मंगळवारी केली होती. त्यावर हल्ला चढविताना मोदी म्हणाले की, सरकारने योजनांमध्ये होणारे घोटाळे थांबवून देशाच्या तिजोरीत भर घातली आहे, असे असतानाही हवालेबाजांना आता आपल्याकडून उत्तरे हवी आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत झालेला दारुण पराभव काँग्रेसच्या पचनी पडलेला नाही, त्यामुळे आता ते प्रत्येक ठिकाणी खोडा घालण्याचा मार्ग अनुसरत आहेत, असे मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कामकाज व्हावे अशी अन्य पक्षांची इच्छा होती, तरी एका पक्षाला मात्र ती बाब अमान्य होती. त्यामुळे जो पक्ष पराभूत झाला आहे, त्यांनी संसदेचे कामकाज चालू देण्यात सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन मोदी यांनी केले. केंद्र सरकारने एकापाठोपाठ निर्णय घेण्याचा सपाटा लावल्याने आणि काळ्या पैशांबाबत कडक कायदा केल्याने हवालेबाज बिथरले आहेत आणि हीच त्यांची समस्या आहे, असेही मोदी म्हणाले.

 

सोनियांची टीका

रायबरेली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेमुळे संतप्त झालेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थान आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यावर आरोप झालेले असताना आपण गप्प का, असा सवाल गांधी यांनी मोदी यांना उद्देशून केला.

 

‘दगाबाज कोण जनता ठरवेल’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर हल्ला चढविल्याने काँग्रेस पक्षाचे नेते संतप्त झाले आहेत. पोकळ घोषणाबाजी करणारे कोण आहेत आणि दगा देणारे कोण आहेत, याचे जनताच मूल्यमापन करील, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी म्हटले आहे.