रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांना रेल्वेकडून पांघरण्यासाठी ब्लँकेट देण्यात येतात. या ब्लँकेटच्या स्वच्छतेबाबत कायमच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतात. आपण रेल्वे प्रवासादरम्यान वापरत असलेली ब्लँकेट किती वेळा धुतली जातात माहितीये? बहुतांश जणांना याबाबत माहिती नसते. तर आधी ही ब्लँकेट सहा महिन्यातून एकदा त्यानंतर दोन महिन्यातून एकदा धुण्यात येत होती. मात्र आता याबाबतचा नियम बदलला असून ही ब्लँकेट एका महिन्यात दोन वेळा धुतली जाणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने याबाबतचा नियम काढला असून त्याचे काटेकोर पालन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न केला जात आहे.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवासी रात्रीच्या वेळी प्रवास करण्याला प्राधान्य देतात. तसेच मागच्या काही काळात एसी कोटमध्ये आरक्षण करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही गाड्या तर संपूर्णत: एसी आहेत. या कोचचे रेल्वे भाडे जास्त असल्याने त्यात प्रवाशांना पांघरुण, जेवण यांसारख्या सुविधा देण्यात येतात. त्यातच ब्लँकेटचा समावेश आहे. याआधी रेल्वेतील एक ब्लँकेट किमान ४ वर्षे वापरायला हवे असा नियम होता. मात्र आता तो नियम शिथिल कऱण्यात आला असून एक ब्लँकेट केवळ २ वर्षांसाठी वापरावे असा नियम करण्यात आला आहे.

आता या ब्लँकेटची किंमत ४०० रुपये असून यापुढे आणखी चांगल्या कापडाचे ब्लँकेट देण्यात येणार असल्याने त्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. या सर्व निर्णयांमुळे रेल्वेच्या आर्थिक यंत्रणेवर भार पडणार आहे. यातील केवळ ब्लँकेटवर खर्च केला जाणारा निधी दुप्पट होण्याची शक्यता आहे. ब्लँकेट धुण्यासाठी पुरेशी यंत्रसामग्री नसल्याने ते धुण्याची संख्या कमी होती. मात्र आता आवश्यक ती सुविधा उपलब्ध झाल्याने महिन्यातून दोनदा ब्लँकेट धुणे शक्य होणार आहे.