गुजरातमधील भारुच जिल्ह्यात एका केमिकल कंपनीत स्फोट झाला असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात ५७ जण जखमी झाले आहेत. दहेज इंडस्ट्रियल इस्टेटमधील कंपनीत हा भीषण स्फोट झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून मृतांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे.

घटनेची माहिती देताना भारुचचे पोलीस अधिक्षक आर व्ही चुडासमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्याकडे आहे. काही मृतदेह घटनास्थळी मिळाले असून, काही जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. बचावकार्य अद्याप सुरु आहे”. जखमींना भारुच आणि वडोदराजवळील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे.

एका अॅग्रो केमिकल कंपनीत बॉयलरमध्ये स्फोट झाल्यानंतर ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. ही कंपनी यशस्वी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. कंपनी औद्योगिक वापरासाठी १५ हून अधिक केमिकलची निर्मिती करतं.

“३५ ते ५७ कर्मचारी आगीत भाजले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे,” अशी माहिती भारुचचे जिल्हाधिकारी एम डी मोडीया यांनी दिली आहे. विषारी केमिकलदेखील परिसरात असल्याने सुरक्षेची उपाययोजना म्हणून शेजारी असणाऱ्या दोन गावांमधील ४८०० गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.