आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्हय़ातील नगरम या खेडय़ात शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास गॅस पाइपलाइनचा स्फोट होऊन १५ ठार तर १८ जण जखमी झाले. ‘गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’ (गेल) या सरकारी उपक्रमाची ही पाइपलाइन होती. स्फोट होताच आग वेगाने पसरली आणि नारळीच्या बागा व घरांना वेढून टाकत अवघ्या १५ मिनिटांत या अग्नितांडवात सारे काही बेचिराख झाले. गुरुवारपासूनच या पाइपलाइनजवळून गॅसचा वास पसरत होता आणि कंपनीला कळवूनही त्यांनी काही केले नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत. गेलच्या कार्यालयावरही संतप्त गावकऱ्यांनी जोरदार दगडफेक केली. या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने तसेच राज्य सरकारनेही दिले आहेत.
मृतांमध्ये पाच महिला, तीन मुली व एका मुलाचा समावेश आहे. एका चहा दुकानदाराने स्टोव्ह पेटवला तेव्हा आग लागली, असे पोलिसांनी सांगितले असले तरी आगीचे नेमके कारण उघड झालेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये मंजूर केले आहेत.