उत्तर चीनमधील मोठे बंदर असलेल्या तियानजिन शहरात घातक रसायने साठवलेल्या एका गोदामात प्रचंड स्फोट होऊन किमान ५० लोक ठार, तर सातशेहून अधिक लोक जखमी झाले. या स्फोटांसोबत उडालेल्या आगीच्या गोळ्यांमुळे रात्रीचे आकाश उजळून निघाले, तसेच मोठय़ा प्रमाणावर मलबा (डेब्रिज) चौफेर पसरला.
चीनच्या इतिहासातील अतिशय वाईट अशा औद्योगिक अपघातांपैकी असलेल्या या घटनेत बुधवारी स्थानिक वेळेनुसार रात्री ११ वाजून २० मिनिटांनी रुइहाई गोदामात दोन मोठे स्फोट होण्याच्या अर्धा तास आधी तेथे आग लागली होती. या आगीचे गोळे इतरत्र उडून आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये आणखी स्फोट झाल्याचे वृत्त झिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने दिले.
या अपघातामुळे १० हजारांहून अधिक लोकांना या परिसरातून इतरत्र हलवण्यात आले आहे. येथील आग सध्या ‘प्राथमिक नियंत्रणाखाली’ असली तरी अग्निशामक दलाचे शेकडो कर्मचारी ज्वालांवर कोरडी पावडर फवारून, तसेच जमिनीवर वाळू पसरून आग पूर्णपणे विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. गोदामात रासायनिक पदार्थ असल्यामुळे कर्मचाऱ्यांना पाण्याचा वापर करता आला नाही आणि आग विझवण्यासाठी त्यांना वाळू व इतर साहित्य वापरावे लागले, असे सरकारी दूरचित्रवाहिनीने सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 14, 2015 3:31 am