पेशावर शहरानजीक एका मिनिबसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात नऊ जण ठार झाले आणि १५ जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. पेशावरमधील मट्टानी बाजारपेठेजवळून बस जात असताना त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. त्यामध्ये एका महिलेसह सात जण जागीच ठार झाले तर दोघे रुग्णालयात मरण पावले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्फोटात जखमी झालेल्या दोन महिलांसह १५ जणांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट झाला त्या वेळी बसमध्ये २० जण होते. बॉम्बमध्ये जवळपास पाच किलो वजनाची स्फोटके वापरण्यात आली होती आणि त्यामुळे या परिसरातील काही दुकानांचेही नुकसान झाले. स्फोट होताच बाजारपेठेतील दुकाने बंद करण्यात आली. सुरक्षा रक्षकांनी या परिसराला वेढा घातला आहे. आतापर्यंत या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नसली तरी अशा प्रकारचे स्फोट तेहरिक-ए-तालिबान, पाकिस्तानकडून घडविले जातात.