पूर्व नेपाळमध्ये भारताकडून विकसित करण्यात आलेल्या पाण्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाच्या (हायड्रोइलेक्ट्रिसिटी) कार्यालयात स्फोट झाल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही आठवड्यांनंतर या प्रकल्पाचे उद्घाटन होणार होते. मात्र, तत्पूर्वी ही घटना समोर आली आहे. या स्फोटात कार्यालयाच्या भिंतींचे मोठे नुकसान झाले आहे.

९०० मेगावॅट क्षमतेचा अरुण-३ हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्प २०२० पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ मे रोजी आपल्या नेपाळ दौऱ्यादरम्यान या प्रकल्पाचे शिलान्यास करणार होते. तत्पूर्वीच या प्रकल्प कार्यालयात स्फोट झाला. या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. तसेच चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणीही स्विकारलेली नाही.
अरुण- ३ प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी २५ नोव्हेंबर २०१४ रोजी या प्रकल्प विकासासाठी करार झाला होता. भारताच्यावतीने सतलज जलविद्युत विभागाने या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

नेपाळमध्ये एका महिन्याच्या आत भारताच्या संपत्तीवर हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी १७ एप्रिल रोजी विराटनगरमध्ये भारतीय दुतावासाच्या क्षेत्रिय कार्यालयाजवळ प्रेशर कुकर पद्धतीचा बॉम्बस्फोट झाला होता. यामुळे परिसरातील भिंतींचे मोठे नुकसान झाले होते.