काश्मीरमध्ये एका मशिदीजवळ झालेल्या स्फोटात १० नागरिक जखमी झाले असून पोलिसांनी शोपियन जिल्ह्य़ात हिजबूल मुजाहिदीनच्या दहशतवाद्याच्या घराजवळ पेरलेली स्फोटके हस्तगत केली.
दहशतवाद्यांनी आता नवी कार्यपद्धती आखली असून शोपियनमधील एका मशिदीजवळ पहाटे स्फोटके पेरून ठेवली. स्टीलच्या ग्लासमध्ये बॉम्ब ठेवून तो रस्त्यालगत ठेवण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले.
सकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला मशिदीतून प्रार्थना करून बाहेर पडलेले १० नागरिक स्फोटात जखमी झाले. त्यापैकी चार जणांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या स्फोटानंतर पोलिसांनी हिजबूलचा दहशतवादी वासीम मल्ला याच्या घराजवळ पेरलेला बॉम्ब हस्तगत केला. त्यानंतर बॉम्बतज्ज्ञांच्या पथकाने तो निकामी केला.
काश्मीरमधील सुरक्षा वाढवली
श्रीनगर- दहशतवाद्यांनी अलीकडेच काश्मीर खोऱ्यात केलेल्या हल्ल्यांचा परिणाम म्हणून, स्वातंत्र्य दिन सोहळ्यापूर्वी संपूर्ण काश्मीर भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी १२ तासांच्या कालावधीत दक्षिण काश्मिरातील शोपियान जिल्ह्य़ात, तसेच उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये केलेल्या चार हल्ल्यांमध्ये सुरक्षा दलाच्या ५ कर्मचाऱ्यांसह १५ लोक ठार झाले होते.