लेबनॉनची राजधानी बैरुतला हादरवणारा प्रचंड स्फोट अमोनियम नायट्रेटचा साठा पेटल्याने झाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले असून, या स्फोटांच्या चित्रफितींतूनही तसेच दिसून येत आहे. या स्फोटात किमान १०० लोक ठार, तर चार हजाराहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती देतानाच, मृतांची संख्या वाढू शकते असेही लेबनीज रेड क्रॉसचे अधिकारी जॉर्ज केट्टाने यांनी म्हटले आहे.

मंगळवारी रात्री झालेल्या या स्फोटानंतर बैरुतच्या रहिवाशांना बुधवारी सकाळी या भीषण विध्वंसाची दृश्ये नजरेला पडली. नागरी युद्ध, इस्रायलसोबतचे संघर्ष आणि दहशतवादी हल्ले सोसणाऱ्या या शहरातील हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्फोट होता. शहराच्या मध्य भागातील प्रमुख रस्त्यांवर दगडमाती आणि उद्ध्वस्त झालेली वाहने विखुरली होती, तसेच इमारतींचे दर्शनी भाग भग्न झाले होते. बेपत्ता किंवा जखमी झालेल्या आपल्या प्रियजनांबाबत कळावे म्हणून लोक रात्रभर शहरभरातील रुग्णालयांमध्ये ताटकळत होते.

फटाके आणि अमोनियम नायट्रेट ..

फटाके आणि अमोनियम नायट्रेट या इंधनामुळे बैरुतला हादरवणारा प्रचंड स्फोट झाल्याचे तज्ज्ञांचे मत असून, या स्फोटाच्या दृश्यांमधूनही तसे सूचित होत आहे.

या स्फोटामुळे झालेल्या नुकसानाची व्याप्ती इतकी होती, की इमारतींच्या खिडक्या स्फोटाचे केंद्र असलेल्या बैरुतच्या बंदरापासून कित्येक किलोमीटर दूर जाऊन पडल्या. शेतात खत म्हणून वापरल्या जाणाऱ्या अमोनियम नायट्रेट या या रासायनिक संयुगामुळे झालेल्या इतर स्फोटांशी हे दृश्य मिळतेजुळते होते.

मात्र या संयुगाचा कधीही स्वत:हून स्फोट होत नाही आणि त्याला पेटवणारा दुसरा स्रोत आवश्यक असतो. बंदरात साठवलेल्या फटाक्यांना लागलेल्या आगीमुळे हे घडून आले असावे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एखाद्या स्फोटाची तीव्रता तज्ज्ञमंडळी स्फोटामुळे निर्माण झालेल्या खड्डय़ावरून निश्चित करतात. बुधवारी सकाळी विमानातून घेण्यात आलेल्या छायाचित्रात हे भगदाड प्रचंड असल्याचे दिसून आले. हा खड्डा आणि दूर उडालेल्या खिडक्यांचे अंतर, यावरून हा स्फोट किमान २.२ किलोटन टीएनटीच्या स्फोटाइतका असल्याचे शस्त्रविषयक तज्ज्ञ सिम टॅक म्हणाले.

२०१४ साली एका मालवाहतूक जहाजातून जप्त करण्यात आल्यानंतर बंदरावरील एका गोदामात साठवण्यात आलेल्या २७०० टनहून अधिक अमोनियम नायट्रेटमुळे हा स्फोट झाला असावा, असे लेबनॉनचे अंतर्गत मंत्री मोहम्मद फहमी यांनी सांगितले. मालाचे प्रमाण पाहता हे जहाज ‘एमव्ही ऱ्होसस’ असावे. २०१३ साली बैरुत बंदरावर आलेले हे जहाज तांत्रिक अडचणींमुळे जप्त करण्यात आले, अशी माहिती या प्रकरणाशी संबंधित वकिलांनी दिली. या अरिष्टाच्या सुरुवातीच्या क्षणांच्या ऑनलाइन चित्रफितींमध्ये, प्रचंड स्फोटाच्या थोडे आधी अग्निज्वाळांमधून उठणाऱ्या धुरातून ठिणग्या व प्रकाश निघत असल्याचे दिसत आहे.

मदतीचे आवाहन

दरम्यान, लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांनी दूरचित्रवाहिनीवरून केलेल्या भाषणात सर्व देशांना, तसेच लेबनॉनच्या मित्रांना या लहान देशाला मदत करण्याचे आवाहन केले. ‘आमच्यावर खरोखरच विनाशकारी संकट ओढवले आहे’, असे ते म्हणाले.