रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथील एका सुपरमार्केटमध्ये बुधवारी रात्री बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात १० जण जखमी झाले आहेत. स्थानिक तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटासाठी घरगुती वस्तूंच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या बॉम्बचा वापर करण्यात आला. त्यामुळे या बॉम्बमध्ये लोखंडाचे तुकडे मोठ्या प्रमाणावर होते. या स्फोटात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. परंतु, १० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्यामागचा उद्देश अजूनही स्पष्ट झालेला नाही.

सुपरमार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ग्राहक ज्याठिकाणी आपल्या बॅग्स जमा करतात तेथील एका लॉकरमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. सध्या तपास यंत्रणांकडून बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात असून आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहत असल्याची माहिती सेंट पीटर्सबर्गच्या तपास समितीचे मुख्याधिकारी अलेक्झांडर क्लाउस यांनी दिली. या स्फोटानंतर खूप मोठा गोंधळ माजला नसला तरी या घटनेनंतर लोक सध्या या परिसरातील दुकानांमध्ये खरेदीसाठी जाणे टाळत आहेत. या स्फोटात १० जण जखमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही क्लाउस यांनी सांगितले.