24 January 2020

News Flash

न्यूझीलंडमधील हल्ल्यांच्या सुडासाठी श्रीलंकेत बॉम्बस्फोट

या हल्ल्यांना नॅशनल तौफिक जमात ही संघटना जबाबदार आहे. या संघटनेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्राथमिक तपासातील निष्कर्ष

न्यूझीलंडमध्ये ख्राइस्ट चर्च येथे १५ मार्च रोजी मशिदींवर करण्यात आलेल्या हल्ल्यांचा सूड घेण्यासाठी श्रीलंकेत रविवारी चर्च आणि पंचतारांकित हॉटेल्सवर दहशतवादी हल्ला करण्यात आला असल्याची माहिती प्राथमिक चौकशीअंती हाती आली आहे, असे एका वरिष्ठ मंत्र्यांनी संसदेत सांगितले.

रविवारी इस्टरच्या सणावेळी झालेल्या हल्ल्यानंतर संसदेच्या तातडीच्या अधिवेशनात संरक्षण राज्यमंत्री रूवान विजेवर्धने यांनी सांगितले, की या हल्ल्यांचा तपास सुरू असून १५ मार्चला न्यझीलंडमधील ख्राइस्ट चर्च येथे मशिदींवर करण्यात आलेल्या हल्ल्यात पन्नास मुस्लीम ठार झाले होते. त्याचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेतील हल्ले करण्यात आले आहेत.

ख्राइस्ट चर्च येथे मुस्लिमांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांचा सूड श्रीलंकेत हल्ले करून उगवण्यात आला, असे सांगून ते म्हणाले, की सात आत्मघाती हल्लेखोर यात सामील होते.

या हल्ल्यांना नॅशनल तौफिक जमात ही संघटना जबाबदार आहे. या संघटनेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सर्व आत्मघाती हल्लेखोर हे श्रीलंकेचे नागरिक असून या दहशतवादी गटाचे आंतरराष्ट्रीय संबंध आहे. स्थानिक दहशतवाद्यांनीच हे हल्ले केले असून मृतांचा आकडा ३२१ झाला आहे. त्यात ३९ परदेशी नागरिक आहेत. त्यात १० भारतीय आहेत.

श्रीलंकेत रविवारी करण्यात आलेल्या हल्ल्यातून जागतिक दहशतवाद आता आमच्या भूमीत पोहोचला आहे, असे पंतप्रधान रणिल विक्रमसिंगे यांनी सांगितले. मुस्लीम समाज या हल्ल्यांच्या विरोधात आहे.  आपण सत्ता हस्तांतरित केली, तेव्हा देश दहशतवाद मुक्त होता. असे हल्ले माझ्या सरकारच्या काळात झाले नाहीत.

आताच्या हल्ल्यामुळे सरकार राष्ट्रीय सुरक्षेत अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते महिंदा राजपक्षे यांनी केला. लोकांच्या सुरक्षेची हमी देता येत नसेल, तर सरकारने पायउतार व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली.

चौकशीतील माहिती..

रविवारच्या हल्ल्यांबाबत काही सरकारी अधिकाऱ्यांना हल्ल्यापूर्वी काही संदेश पाठवण्यात आले होते. त्यात इस्लामी दहशतवादी गटाच्या सदस्यांनी ख्राइस्ट चर्च येथे उजव्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता. त्याबाबतचे संदेश समाजमाध्यमांवरही टाकण्यात आले होते.

जबाबदारी ‘आयसिस’ने स्वीकारली

श्रीलंकेतील  साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी मंगळवारी आयसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या साखळी स्फोटांमध्ये ३२१ जण ठार झाले, तर ५०० हून अधिक जण जखमी झाले होते. श्रीलंकेने त्यापूर्वी स्थानिक इस्लामिक संघटना नॅशनल तौहीद जमातवर संशय व्यक्त केला होता. बॉम्बस्फोट ज्या पद्धतीने घडविण्यात आले त्यामध्ये आयसिसच्या खुणा स्पष्ट दिसत असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी म्हटले होते.अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि श्रीलंकेतील ख्रिश्चन यांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा आयसिसने ‘अमाक’ वृत्तसंस्थेमार्फत एका निवेदनाद्वारे केला, असे जिहादी कारवायांवर लक्ष ठेवणाऱ्या साइट इंटेलिजन्स गटाने म्हटले आहे.

संशयित ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद

साखळी बॉम्बस्फोटांपैकी एका चर्चमध्ये झालेल्या स्फोटातील संशयित आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याचा एक व्हिडीओ समोर आल्याचे वृत्त आहे. आत्मघातकी पथकांद्वारे हे स्फोट घडविण्यात आल्याचा अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

कोलंबोतील सेंट सेबॅस्टियन चर्चमध्ये स्फोट झाला त्यापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एक व्यक्ती पाठीवर बॅग घेऊन जाताना फुटेजमध्ये दिसत आहे. चर्चमधील गर्दीचा फायदा घेऊन ही व्यक्ती एक बॅग घेऊन थेट चर्चमध्ये शिरली आणि त्यानंतर काही वेळाने तेथे स्फोट झाला. सदर आत्मघातकी हल्ला करणारी व्यक्ती हीच असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. श्रीलंकेतील सियाथा टीव्हीने हे सीसीटीव्ही फुटेज प्रसारित केले आहे. या फुटेजच्या हवाल्याने याबाबत ट्वीट करण्यात आले आहे.

First Published on April 24, 2019 1:50 am

Web Title: blasts in sri lanka for attacks in new zealand blast
Next Stories
1 राहुल गांधीना नोटीस
2 २०२३ पर्यंत नक्षलवाद्यांचा संपूर्ण नायनाट -गृहमंत्री
3 साध्वी प्रज्ञासिंह यांचा केवळ संशयावरून तुरुंगात  छळ – रामदेव बाबा
Just Now!
X