राम मंदिर भूमिपूजनावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर विश्व हिंदू परिषदेने टीका केली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल उद्धव ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे शिवसेनेच्या अधःपतनाची तयारी असून उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ढोंगीपणाचं असल्याची टीका विंहिपचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी केली आहे. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचं भूमिपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात यावं असं म्हटलं होतं. या वक्तव्यानंतरच वादाची ठिणगी पडली होती.

अवश्य वाचा – राम मंदिर भूमिपूजन : ८०० किलोमीटरचा प्रवास करुन मुस्लीम भाविक राहणार सोहळ्याला उपस्थित

“व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भूमिपूजन करावं हे उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य आंधल्या विरोधातून आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेचं या वक्तव्यामुळे अधःपतन झालंय. मंदिराच्या उभारणीसाठी भूमिपूजन हे पवित्र काम आहे, ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करता येणार नाही. भूमिपूजनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून होणार आहे. या कार्यक्रमात फक्त २०० लोकं सहभागी होतील हे आधीच जाहीर करण्यात आलंय. त्यामुळे करोनाची चिंता असल्याचं दाखवत भूमिपूजनाबद्दल उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ढोंगीपणाचं आहे.” कुमार यांनी विहिंपच्या पत्रकार परिषदेत बाजू मांडली.

राम मंदिराच्या निर्माणावरुन देशात अनेक राजकीय वादळं आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेरीस राम मंदिर निर्माणासाठी ट्रस्टची स्थापना झाली असून ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष तयारी सुरु झाली आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी संगम अर्थात गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम असलेल्या ठिकाणाची माती अयोध्येत आणण्यात येणार आहे. तसेच, गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी १२८ फूट इतकी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडानं बनवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता ५ कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत.