पाकिस्तानातील ‘नाटो’चे सर्व पुरवठा मार्ग बंद करण्याचा इशारा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी दिला आहे. अमेरिकेकडून होणारे ड्रोन हल्ले थांबविण्यात येईपर्यंत नाटो मार्ग बंद करण्याचे इम्रान खान यांच्या पक्षाने ठरविले आहे.
खैबर पख्तुन्वा प्रांतातून जाणाऱ्या नाटो पुरवठा ट्रकची वाहतूक यापूर्वीच तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने रोखलेली आहे. आता पंजाब आणि बलुचिस्तान प्रांतातील वाहतूक रोखण्याचा पक्षाचा विचार आहे. चमन सीमेवरून ही वाहतूक करण्यात येत असल्याचे इम्रान खान यांनी एका वृत्तपत्राला सांगितले. पाकिस्तानची राष्ट्रीय असेंब्ली आणि खैबर-पख्तुन्वा असेंब्लीने ड्रोन हल्ले म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचा आणि पाकिस्तानाच्या सार्वभौमत्वाचा भंग असल्याचा ठराव पारित केला आहे, असेही इम्रान खान म्हणाले. अमेरिकेकडून ड्रोन हल्ले थांबविण्यात येईपर्यंत नाटोचे पुरवठा मार्ग बंद राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.