आज ‘इकॉनॉमिक टाइम्स’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार अ‍ॅमेझॉन इंडियाच्या जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीत झालेल्या विक्रीमध्ये तब्बल १५०% वाढ झाली असून दर दिवशी ९०,००० नवीन उत्पादनं कंपनीने विक्रीसाठी उपलब्ध केली. अ‍ॅमेझॉनच्या बाजारातील (मार्केट प्लेस) विक्रेत्यांच्या संख्येत २५०%ची वाढ झाली असून ती ८५००० च्या घरात गेली आहे. गेल्या वर्षी फ्लिपकार्टने ७० कोटी डॉलरची गुंतवणूक आकृष्ट केल्यानंतर कंपनीचे मूल्य १५ अब्ज डॉलर पर्यंत वधारले होते. स्नॅपडीलनेही जपानच्या सॉफ्ट बॅंकेकडून २० कोटी डॉलरची गुंतवणूक मिळवून आपले मूल्य ६.५ अब्ज डॉलरपर्यंत नेले होते. पण गेल्या काही महिन्यांत या दोन्ही कंपन्यांना ओहोटी लागल्याचे दिसत असून, दोन महिन्यांपूर्वी मॉर्गन स्टॅन्लीने फ्लिपकार्टमधील आपल्या गुंतवणूकीचे अपेक्षित मूल्य तब्बल २७%ने कमी केल्याने एका रात्रीत फ्लिपकार्टचे मूल्य ११ अब्ज डॉलरपर्यंत घसरले. भविष्यात ते आणखी घसरेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
गेले वर्षभर इ-रिटेल क्षेत्रात फ्लिपकार्ट वि. स्नॅपडील अशी स्पर्धा रंगली होती. अ‍ॅमेझॉन इंडिया क्रमांक ३ वर होती. पण गेल्या काही महिन्यांपासून इ-रिटेल क्षेत्रावर आलेले मळभ हीच आपल्यासाठी सुवर्णसंधी असल्याचे ओळखून अ‍ॅमेझॉनने भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकीला प्रारंभ केला. फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलचे कच्चे दुवे ओळखून त्या क्षेत्रात अ‍ॅमेझॉनने स्वतःच्या सेवांत मोठी सुधारणा केली. बहुतांश भारतीय मोबाइलवरून इंटरनेटचा वापर करत असल्यामुळे फ्लिपकार्टने आपले मोबाइल साइट बंद केले. यामुळे आपले ग्राहक फ्लिपकार्ट अ‍ॅप डाउनलोड करतील आणि त्यामुळे आपल्याला सदासर्वदा त्यांच्याबद्दल मोलाची माहिती मिळत राहील असा फ्लिपकार्टचा समज होता. पण फोनवरील जागेचा तसेच मोबाइल डेटाचा थेंब थेंब पुरवून वापर करणारे भारतीय ग्राहक कोणती अ‍ॅप आपल्या मोबाइलवर कायमस्वरूपी ठेवायची याबाबत चोखंदळ असल्याने त्यांना फ्लिपकार्टची ही खेळी पसंत पडली नाही. अनेकांनी नाइलाजाने फ्लिपकार्ट अ‍ॅप डाऊनलोड केले. पण अनेकांनी रागाने दुसरीकडून खरेदी करायला सुरूवात केली. स्नॅपडील “लॉजिस्टिक” म्हणजेच कुरियर सेवांचे महत्त्वं जोखण्यात कमी पडले. त्यामुळे ग्राहकांना कमीत कमी अवधीत, त्यांनी ऑर्डर केलेलेच उत्पादन पोहोचवण्याबाबत स्नॅपडील फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनच्या मागे पडले.
अ‍ॅमेझॉनचा इ-रिटेल क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे. अमेरिकन रिटेल क्षेत्रात ३०% वाटा असलेल्या अ‍ॅमेझॉनचे बाजारमूल्य ३०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. सुरूवातीची १० वर्षं तोट्यात काढल्यानंतर आज अ‍ॅमेझॉन मोठ्या प्रमाणावर फायदा कमावत असून भारतात गुंतवणूक करायला कंपनीने ५ अब्ज डॉलर ठेऊन दिले आहेत. अर्थात अ‍ॅमेझॉनचे जागतिक आणि भारतीय मॉडेलमध्ये मोठा फरक आहे. जगात इतरत्र अ‍ॅमेझॉन स्वतः मोठ्या प्रमाणावर उत्पादनं खरेदी करून ग्राहकांपर्यंत पोहचवते. भारतात अ‍ॅमेझॉनने नारायण मूर्तींच्या कॅटामरान व्हेंचर्ससह काढलेली “क्लाउडटेल” हे काम करत असली तरी इ-रिटेल क्षेत्रातील विदेशी गुंतवणूकीवर तसेच परदेशातून माल आयात करण्याबाबत मर्यादा असल्याने कंपनीला मार्केट-प्लेस मॉडेलवर भर द्यावा लागत आहे.
२९ मार्च २०१६ रोजी भारत सरकारने इ-रिटेल क्षेत्रातील मार्केटप्लेस मॉडेलमध्ये १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी दिली. यापूर्वी फक्त बी२बी मॉडेलमध्ये अशी परवानगी होती. मार्केटप्लेस मॉडेल म्हणजे –रिटेल साइट/कंपन्या सर्व मालाची स्वतः खरेदी विक्री न करता हजारो व्यापाऱ्यांना आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवणार. त्यांना ग्राहकांच्या सवयींविषयीची माहिती (अ‍ॅनालिटिक्स) – उत्पादनं, कुठल्या ठिकाणी, कुठल्या हंगामात, कोणत्या वयोगटाच्या ग्राहकांकडून, काय किमतीला खरेदी केली जात आहेत इ. – पुरवून तसेच उत्पादनांचे पॅकेजिंग, पॅकिंग, वाहतूक इ. क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी स्वतःची सेवा उपलब्ध करून देऊन त्यांना अधिकाधिक विक्री करण्यास मदत करतात. तसेच आपल्या प्लॅटफॉर्मवरील दुकानदारांनी ग्राहकांना दिलेले डिस्काउंट अप्रत्यक्ष मार्गाने त्यांना भरून देण्याचा प्रयत्न करतात.
अ‍ॅमेझॉन आणि अन्य कंपन्यांनी अवलंबिलेल्या या प्रकारांबद्दल किरकोळ क्षेत्रातील दुकानदारांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येऊ लागल्या. ऑनलाइन बाजारात अनेकदा उत्पादनं व्यापाऱ्यांना पडणाऱ्या किमतींपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध असतात. तसेच दर महिन्याला या ना त्या निमित्ताने लागणाऱ्या बंपर सेलमध्ये डिस्काउंटच्या नावाखाली या कंपन्या मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करून ग्राहकांना माल विकतात. अशा आतबट्याच्या सौद्यांमुळे सामान्य व्यापाऱ्यांचे जगणे कठीण होत आहे. किरकोळ क्षेत्रावर देशातील ५ कोटीहून अधिक कुटुंबांचा रोजगार अवलंबून असल्याने सरकारने ही आर्जवं गांभीर्याने घेतली.
नवीन नियमांनुसार, मार्केटप्लेस मॉडेलमध्ये एका व्यापाऱ्याचा हिस्सा २५%हून अधिक असता कामा नये. सध्या अ‍ॅमेझॉनवर होणाऱ्या एकूण विक्रीत क्लाउडटेलचा हिस्सा ४०%हून अधिक असून तीच परिस्थिती फ्लिपकार्टवर त्यांची स्वतःची कंपनी डब्लू एस रिटेलची आहे. या कंपन्यांच्या विश्वासार्हतेमुळे अनेक लोकं ऑनलाइन शॉपिंग करताना क्लाउडटेलला प्राधान्य देतात. त्यामुळे हा टक्का कमी करायचा तर अ‍ॅमेझॉनला इतर व्यापाऱ्यांना अधिक चांगली सेवा पुरवावी म्हणून प्रशिक्षित करावे लागेल आणि दुसरीकडे क्लाउडटेलवरील किंमती वाढवून किंवा मालाची आवक-जावक कमी करून नियमांचे पालन करावे लागेल.
असे होणे एवढ्यात तरी शक्य नाही याची जाणीव असलेल्या या कंपन्यांनी नवीन धोरणाच्या अंमलबजावणीसाठी -एका व्यापाऱ्याचा वाटा २५%पर्यंत मर्यादित करण्यासाठी- एप्रिल २०१७पर्यंत मुदतवाढ द्यावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण अ‍ॅमेझॉनच्या पुराचा धसका घेतल्याने स्नॅपडीलसह अन्य छोट्या इ-रिटेलर्सनी नवीन धोरणाच्या तात्काळ अंमलबजावणीची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे किरकोळ क्षेत्रातील छोटे आणि मोठे (मॉल) दुकानदार यांनी अशी मुदतवाढ देण्याला विरोध दर्शवला आहे.
असे असले तरी भारत ही अमेरिकेखालोखाल सर्वात मोठी बाजारपेठ होऊ शकते हे ओळखूनअ‍ॅमेझॉनने छोट्या मोठ्या अडचणींचा विचार न करता  भारतात मोठ्या प्रमाणावर विस्तारीकरणाला प्रारंभ केला आहे. बेंगळुरूमधील आपल्या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर वाढ करत असतानाच अ‍ॅमेझॉन हैदराबादला १० एकर जागेवर नवीन कॅंपस उघडत असून अमेरिकेखालोखाल तो जगातील सर्वात मोठा कॅंपस असणार आहे. त्यात सुमारे १४००० लोकं काम करणार आहेत. आज तब्बल ३.५ कोटी उत्पादनं अ‍ॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध असून देशातील १९००० पिन कोडवर कंपनी माल पोहचवत आहे. भविष्यात एकसमान पॅकिंगसाठी विक्रीपश्चात सेवेसाठी आपल्याशी संलग्न व्यापाऱ्यांचे प्रशिक्षण करण्याची योजना कंपनीने बनवली आहे. अ‍ॅमेझॉनच्या आक्रमकतेमुळे देशातील इ-रिटेल क्षेत्रातील स्पर्धा पुन्हा एकदा तीव्र झाली असून फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलसारख्या मोठ्या आणि शॉपक्लूज, जबॉंग, इन्फिबिम आणि पेटीएमसारख्या लहान-मध्यम कंपन्या जगभरातून तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि भागिदाऱ्या आकृष्ट करून अ‍ॅमेझॉनला तोंड देतात का त्यासमोर नांगी टाकतात हे पुढील वर्ष-दोन वर्षांत स्पष्ट होणार आहे.
– अनय जोगळेकर
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)