बरोबर एक वर्षापूर्वी, संपूर्ण भारतभरात आपला प्रचाररथ फिरवत जागोजागी सभा घेत असताना नरेंद्र मोदी यांची एक शैली होती. ज्या शहरात सभा असेल तेथील स्थानिक भाषेतील एक-दोन वाक्ये बोलायची, नमस्कार वगैरे सुरूवात करायची आणि नंतर आपल्या मूळ पदावर यायचे, ही त्यांची रीत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये त्यांनी याची चुणूक दाखवली होती.
महाराष्ट्राशी असलेली गुजरातची जवळीक, मराठी व्यक्तींशी मोदी यांचे असलेले सख्य यांमुळे कदाचित त्यांना मराठी बोलणे सुलभ जात असावे. मात्र तेलुगु, तमिळ अशा भाषांमध्ये त्यांनी साधलेला संवाद हे निव्वळ प्रचाराचे अंग होते, हे दिवसाढवळ्या जाणवणारे सत्य होते. पण ‘गंगा गए गंगादास, जमना गए जमनादास’ या व्यापारी धोरणाची ती अतिचतुर अंमलबजावणी होती आणि तिचे परिणाम नंतर दिसूनही आले.
हे सर्व आठवायचे कारण म्हणजे नुकतेच भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दाखविलेल्या याच कौशल्याची झलक. मोदी यांची निवडणूक अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीच्या वळणावरच झाल्याची चर्चा सातत्याने होत असते. त्यामुळे त्यांच्याच समोर एका अमेरिकन अध्यक्षाने त्यांचाच कित्ता गिरविणे, ही गंमतीदार बाबच होती. मात्र ते मोदींच्या पावलावर पाऊल देत नसून, ती त्यांच्या वाटचालीचाच एक टप्पा होता. दिल्लीत आल्यानंतर नमस्ते करणारे आणि वॉशिंग्टनमध्ये ‘केम छो’ने मोदींचे स्वागत करणारे ओबामा व्हाईट हाऊसमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा होलाँद आल्यानंतर ‘बोनजूर’ म्हणतात किंवा कुठल्याही देशाच्या नेत्यासमोरही तेच करत असावेत.
मोदी यांनी केवळ एक दोन वाक्यावर तरी भागविले. ओबामा काय किंवा त्यांच्या आधीचे धाकटे जॉर्ज बुश काय, हे मोदी यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे होते. २००४ सालच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जॉर्ज डब्लू. बुश आणि जॉन केरी या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी अनेक ठिकाणी स्पॅनिशमध्ये बोलून प्रचार केला होता. खरे तर केरी यांचे प्रभुत्व फ्रेंच भाषेवर. मात्र फ्रेंचविषयी त्यांच्या ममत्वामुळे विरोधकांची टीका सहन करावी लागली, तेव्हा त्यांनी इंग्रजी व स्पॅनिशची कास धरली. मतदारांचे स्वरूप बघता त्यांना तसे करावेच लागले. त्यामुळेच ज्यावेळी इंग्रजीला अधिकृत भाषेचा दर्जा देणारे विधेयक “सिनेट’ संमत करत होते, त्यावेळी अध्यक्ष बुश हे ‘इंग्लिश ओन्ली’चे समर्थक नाहीत, असे त्यांचे महाधिवक्ता अल्बर्टो गोन्झाल्वेस यांना सांगावे लागले.
२०१२ साली तर ओबामांनी आपल्या प्रचारासाठी आपल्या अधिकृत संकेतस्थळाची स्पॅनिश आवृत्तीच काढली. आपल्याकडे अल्पसंख्य मतदारांना रिझविण्यासाठी उर्दूत पत्रके छापतात, त्याचाच हा अमेरिकी अवतार होता. तेच धोरण ओबामांनी पुढे चालविले.
भारतात पाय ठेवल्यापासून प्रयाण करेपर्यंत सर्व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ओबामा यांनी ‘नमस्ते’, ‘चाय पे चर्चा’, ‘बडे बडे देशों में’ अशा भारतीय शब्दांची पखरण केली. त्यांच्या अनुनासिक अमेरिकी स्वरांमध्ये हे शब्द व वाक्प्रयोग बाहेर पडत होते, तेव्हा अमेरिकी स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याला मनोमन दैवत्व बहाल केलेल्यांच्या मनमोराचा पिसारा फुलत होता. मात्र, ‘व्हेन इन रोम, बिहेव लाईक रोमन्स’ हे रोमन साम्राज्याचा वारसा चालविणाऱ्या धंदेवाईक महासत्तेच्या अध्यक्षाएवढे आणखी कोणाला कळणार होते? कारण बहासा इंडोनेशिया ही भाषा चांगली येत असतानाही तिचा वापर न करणारे ओबामा हिंदीच्या प्रेमात कशाला पडतील? स्वतःच्या देशात बफेलो आयलंड आणि बंगळूरची सातत्याने तुलना करून आपल्या देशी श्रोतृवर्गाला आकर्षित करणारे ओबामा भारतीय भाषांवर कशाला भाळतील? ते तर आपल्या पूर्वसुरींच्याच पदचिन्हांवर चालत होते.
दुसऱ्या महायुद्धाला २० वर्षे उलटायच्या आत जॉन एफ. केनेडी यांनी बर्लिनमध्ये एक भाषण केले होते. जगातील नावाजलेल्या भाषणात त्याचा समावेश केला जातो. ‘इष बिन आईन बर्लिनर’ (मी एक बर्लिनवासी आहे) हे वाक्य त्या वेळी केनेडी यांनी उच्चारले होते आणि शीतयुद्धाच्या काळात पश्चिम जर्मनीतील आपला खुंटा हालवून बळकट केला होता. त्यावेळी जर्मन उच्चार नीट व्हावेत, यासाठी रोमन लिपीतच त्यांना व्यवस्थित उच्चार लिहून देण्यात आले होते. बर्लिनर म्हणजे बर्लिनवासी. मात्र केनेडी यांनी आईन बर्लिनर या ऐवजी केवळ बर्लिनर म्हणायला हवे होते, कारण ‘आईन बर्लिनर’ म्हणजे बर्लिनमध्ये मिळणारा एक डोनट. तेव्हा केनेडींचे वाक्य व्याकरणशुद्ध नव्हते, असा एक प्रवाद अनेक वर्षे प्रचलित होता. मात्र महासत्तेच्या सेवकांची फौज दिमतीला असताना अशी चूक होऊच कशी शकेल?
त्यानंतर याच जर्मनीमध्ये १९९४ साली बिल क्लिंटन यांनी आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असे जर्मनीवासियांना त्यांच्या भाषेतच सांगितले होते. अर्थात त्यांच्या भाषणात केनेडी यांच्यापेक्षा अधिक सफाई होती. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मलेले पहिले अमेरिकी अध्यक्ष असलेल्या क्लिंटन यांनी जर्मन भाषेचा अभ्यास केला होता.
दुर्दैवाने भारत आणि भारतीय भाषांवर मनापासून प्रेम असलेल्या व्यक्तींची, ते अमेरिका-इंग्लंडचे नसतील, तर आपण दखल घेत नाही. ”आपल्या दृष्टीने फॉरेन म्हणजे इंग्लंड किंवा अमेरिका,” असं पुलंनी एके ठिकाणी लिहिलंय. ते अक्षरशः खरं आहे. पोलंडचे राजदूत प्योत्र क्लोदकोव्स्की हे याबाबतीत उत्तम उदाहरण ठरतील. तीन वर्षांपूर्वी ते पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या तोंडून हिंदी कविता आणि संवाद ऐकणे ही पर्वणी होती. ते संस्कृतमध्येही पारंगत आहेत.
रशियाचे राजदूत अलेक्झांडर कदाकिन हेही ज्याला हिंदीत ‘धाराप्रवाह’ म्हणतात, अशी हिंदी बोलतात. मात्र त्यामुळे कोणी मोहरून जाताना दिसत नाही. मात्र अमेरिकी अध्यक्ष हिंदी बोलतात असे म्हटले, की अनेकांच्या कौतुकाचा बांध फुटतो.
त्यामुळे अध्यक्षांचे नमस्ते हे बर्लिनरच्या मार्गावरील पुढले, पण अनेकांपैकी एक स्थानक आहे, इतकेच त्याचे अस्तित्व. हिंदी संवादापेक्षा त्याचा अर्थ समजणे अधिक महत्त्वाचे. कारण वॉल्ट व्हिटमन या अमेरिकेच्याच कवीने म्हटल्याप्रमाणे, “ही सगळी माया तर नाही ना?” (Have you no thought, O dreamer, that it may be all maya, illusion?)
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)