तमिळनाडूमध्ये फिरताना काही मोजक्या ठिकाणी रंगलेल्या भिंतींवर अण्णाद्रमुक पक्षाच्या उमेदवारांच्या नावापूर्वी एक उल्लेख न चुकता असायचा. “पुरट्चि तलैवी अम्माविन आसीपेट्र” (श्रेष्ठ नेत्या अम्मा यांचा आशीर्वाद लाभलेले) हा तो उल्लेख. जे. जयललिता या आगळ्या वेगळ्या महिलेची पक्षावर किती पकड आहे, याचा तो लेखी पुरावा होता. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सोपी असलेली लढत शेवटच्या टप्प्यात अनिश्चित झाली, तरी बाईंनी हिकमतीने ती ओढून आणली. गेल्या तीस वर्षांपासून कोणतेही सरकार पुन्हा निवडून न देण्याचा तमिळनाडूचा पायंडा यामुळे मोडला आहे. शिवाय १९७२ साली एम. जी. रामचंद्रन यांनी स्थापन केलेल्या अण्णा द्रमुक पक्षाला पहिल्यांदाच त्यांनी पक्ष संस्थापकाच्या छायेतून बाहेर आणले आहे.
एकूणात प्रशासनावर पकड आणि राजकारणात जरब असली, तरी दारू दुकानांच्या धोरणामुळे जयललितांबाबत नाराजी होती. खासकरून महिलांमध्ये दारूबंदीबाबत असलेली आपुलकी त्यांना नडणार, असेच वाटत होते. परंतु, मुख्यमंत्रीपदाचा मोह ९३व्या वर्षीही सोडता न आलेल्या करुणानिधींनी त्यांचा रस्ता सोपा केला म्हटले तरी चालेल. स्टॅलिन यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केले असते तर द्रमुकला फायदा झाला असता का, हा प्रश्न मदुरैला एकाला विचारला होता. तेव्हा तो म्हणाला होता, “नाही तरी असे किती दिवस तात्ता (आजोबा) राहणारेत?”
अर्थात मदुरै हा द्रमुकचा गड, त्यामुळे द्रमुकबद्दल त्याला सहानुभूती असणे स्वाभाविक होते. प्रत्येकाला एवढा आशावाद बाळगणे अवघड आहे. शिवाय अळगिरी या आपल्या मोठ्या मुलाला पक्षकार्यापासून संपूर्णपणे दूर ठेवून करुणानिधींनी आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला. निवडणुकीच्या काळात याच अळगिरींनी अनेक वृत्तपत्रांना मुलाखत देऊन आपली नाराजी चव्हाट्यावर मांडली होती. ‘अठराव्या शतकात औरंगजेब जसा पिता होता तसेच या एकविसाव्या शतकात करुणानिधी आहेत’ हे त्यांचे एका मुलाखतीतील वाक्य होते. अण्णा द्रमुक आणि द्रमुक यांच्यातील अंतर २५-३० जागांचेच आहे, हे पाहता स्टॅलिन यांना पुढे आणले असते तर फरक पडला असता, असे म्हणायला वाव आहे.
मागे एकदा उल्लेख केल्याप्रमाणे, महाराष्ट्रातील मनसेप्रमाणे ‘मक्कळ नल कुट्टनी’ (लोककल्याण आघाडी) या नावाच्या कडबोळ्याचा उपयोग करून घेण्यात अम्मा यशस्वी झाल्या. ‘देसिय मुरपोक्कु द्रविड कळगम’ (राष्ट्रीय प्रगतीशील द्रविड पक्ष) हा पक्ष म्हणजे या आघाडीचा प्राण होय. कधीकाळी रजनीकांतशी ईर्षा करणाऱ्या विजयकांत या अभिनेत्याच्या या पक्षाला अद्याप तरी एकही जागा मिळताना दिसत नाही, परंतु, द्रमुकची मते खाण्याचे काम या पक्षाने ईमाने ईतबारे केले आहे. खुद्द विजयकांत हे उळंदुरपेट्टै या मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यांच्यासोबत गेलेले वैको यांच्या मरुमलर्ची द्रविड मुन्नेट्र कळगम (पुनरुत्थान द्रविड प्रगती पक्ष) आणि कम्युनिस्ट पक्षही तोंडावर आपटले आहेत.
१९८८ साली एमजीआर यांचे निधन झाल्यानंतर आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत या दिवंगत नेता-अभिनेत्याच्या करिष्म्याचा उपयोग अम्मांनी करून घेतला होता. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी संपूर्ण प्रचार स्वतःभोवती केंद्रित ठेवला होता. प्रत्येक मतदारसंघात मीच उमेदवार आहे असा प्रचार करा, असा आदेशच त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला होता. प्रत्येक भाषणात त्या ‘मुलाला काय पाहिजे, हे एका आईलाच चांगलेच कळते,’ असे सांगून भावनिक साद घालायच्या. त्यामुळे महिलांना स्वतःकडे फिरवून घेणे, त्यांना सोपे गेले असावे. अम्मा उणवगम (कॅँटिन), अम्मा तन्नी (पाणी), अम्मा मरुत्वगम (औषधी दुकान) अशा उपक्रमांमुळे त्यांच्या दाव्याला बळही आले होते. जनतेशी थेट न भेटताही जनतेसाठी काम करत असल्याचे ठसविण्यात त्या यशस्वी झाल्या.
मात्र, तमिळनाडूच्या जनतेची प्रतिक्रिया पाहिली तर त्यांना एका वाईट गोष्टीपेक्षा तिच्याहून कमी वाईट गोष्ट तेवढी निवडायची होती. कांशीराम यांच्या भाषेत ‘सापनाथ आणि नागनाथ यांच्यामधून’ त्यांना निवड करायची होती. अण्णा द्रमुकने आपला जाहीरनामा जाहीर केला, तेव्हा आमच्याच जाहीरनाम्याची कॉपी केली म्हणून स्टॅलिन आणि कनिमोळी यांनी टीकेची फैर सोडली होती. मात्र खुद्द द्रमुकनेच आमचा जाहीरनामा कॉपी केला असून आता तो तिसऱ्या पक्षावर हा आरोप करत आहे, असा आरोप ‘पाट्टाळी मक्कळ काट्ची’चे नेते अन्बुमणी रामदास यांनी केला होता. यावरून कुठल्याच पक्षामध्ये धोरणात्मक फरक असा काही नव्हताच, हेही दिसत होते.
म्हणूनच गलितगात्र झालेल्या आणि पारिवारिक कलहाने त्रस्त झालेल्या करुणानिधी यांच्यापेक्षा अम्मा त्यांना सापनाथ वाटल्या असाव्यात. ‘द्रमुक निवडून आला असता, तर आपला (करदात्यांचा) सगळा पैसा उदयनिधी स्टॅलिन (एम. के. स्टॅलिन यांचा अभिनेता मुलगा) याने नयनतारासोबत काम करण्यासाठी खर्च केला असता,’ ही ट्विटरवर आलेली एक प्रतिक्रिया खूप सूचक होती.
शिवाय या निवडणुकीत सगळ्यात भारी ठरला तो पैसा. सत्ताधारी पक्ष म्हणून अण्णा द्रमुकला अधिक संसाधने उपलब्ध होती. त्यामुळे मतदारांना अण्णा द्रमुककडून अधिक अर्थपुरवठा झाला असल्याची शक्यता आहेच. याबाबत द्रमुकने सुरूवातीपासूनच तक्रारीचा सूर लावला होता. मात्र त्याचा काय उपयोग? तमिळिसै सौंदरराजन यांच्यासारख्या स्थानिक महिला नेत्याला प्रमुखत्व देण्याचे आणि प्रचारात आघाडी घेण्याचे फळ भाजपला मिळालेले दिसत असून दोन जागा त्याला मिळतील, अशी चिन्हे आहेत.
थोडक्यात, एमजीआरच्या करिष्म्याला निरोप देऊन त्या जागी अम्मांची झालेली स्थापना, प्रस्थापितविरोधी मतदानाची खंडीत केलेली परंपरा आणि भारतीय जनता पक्षासारख्या ‘उत्तर भारतीय’ पक्षाला करून दिलेला चंचुप्रवेश, ही तमिळनाडूच्या यंदाच्या निवडणुकीची वैशिष्ठ्ये ठरली. वर्ष २०१६ हे तमिळनाडूच्या राजकारणाची कूस बदलल्याचे वर्ष म्हणून नोंदले जाईल, हे नक्की!
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)