बांगलादेशातील एका धर्मनिरपेक्ष ब्लॉगरची पाच अज्ञात हल्लेखोरांनी शुक्रवारी कुऱ्हाडीने हत्या केली. देशात अशाप्रकारे करण्यात आलेली यावर्षीची ही चौथी हत्या आहे.
ढाक्यातील उत्तर गोऱ्हान भागात राहणारे ४० वर्षांचे निलॉय नील यांच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शिरून हल्लेखोरांनी त्यांचा खून केला. शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर घरात शिरलेल्या या हल्लेखोरांनी कुऱ्हाडींचा वापर करून नील यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांच्यावर वारंवार घाव घातल्याचे दिसते, असे नजीकच्या पोलीस ठाण्याचे ठाणेदार मुस्ताफिझुर रहमान यांनी सांगितले.
एका गैरसरकारी संस्थेचे अधिकारी असलेले नील हे त्यांच्या कुटुंबीयांसह अपार्टमेंटमध्ये राहात होते आणि ब्लॉगवर धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे लेखन करण्यासाठी ते ओळखले जात. १९७१ साली पाकिस्तानी सैनिकांसोबत बांगलादेशींवर अत्याचार करणाऱ्या युद्ध गुन्हेगारांना मृत्युदंडाची शिक्षा व्हावी यासाठी मोठय़ा प्रमाणावर मोहीम राबवणाऱ्या गनजागरण मंचाचेही ते कार्यकर्ते होते. नियमितपणे ब्लॉग लिहिणारे निलॉय हे इस्लामी कट्टरवाद्यांचे लक्ष्य होते, असे या संघटनेचे इम्रान सरकार म्हणाले.