भारतात ‘कोव्हिशिल्ड’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीच्या लशीमुळे रक्तातील पेशी (ब्लड प्लेटलेट्स) कमी होण्याची परिस्थिती उद्भवण्याचा काही प्रमाणात धोका असल्याचे ब्रिटनमधील एका देशव्यापी संशोधनात आढळले आहे.

‘इडियोपॅथिक थ्रॉम्बोसायटोपेनिक पुरपुरा’ (आयटीपी) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या परिस्थितीचा धोका दर १० लाख लशींमध्ये ११ इतका असून, तो फ्लू आणि मेझल्स, मंप्स व रुबेला (एमएमआर) या लशींच्या बाबतीत असलेल्या आकड्याइतकाच आहे, असे संशोधकांनी सांगितले.

रक्तवाहिन्यांना हानी पोहचल्यानंतर रक्ताची क्षती होण्यास प्रतिबंध करणाऱ्या रक्तपेशी म्हणजे प्लेटलेट्स होत. त्यांची संख्या कमी झाल्यामुळे रक्तस्राव होण्याचा किंवा काही बाबतीत रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका उद्भवू शकतो, असेही हे संशोधक म्हणाले.

सरासरी ६९ वर्षे वय असलेल्या जास्त वयाच्या, तसेच हृदयविकार, मधुमेह किंवा गंभीर स्वरूपाचा मूत्रपिंडाचा आजार असलेल्या लोकांना आयटीपीचा सर्वाधिक धोका आहे, असे ब्रिटनमधील एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्वाखालील या पथकाला आढळले.

या संशोधनाचे निष्कर्ष ‘नेचर मेडिसिन’ या नियतकालिकात बुधवारी प्रसिद्ध झाले. लस घेतल्यानंतर आयटीपी उद्भवण्याची शक्यता, कोविड-१९ मुळे ही परिस्थिती उद्भवण्यापेक्षा कमी आहे, यावर लेखकांनी भर दिला आहे.