देशातील तेरा बंदरे नील ध्वज प्रमाणन मानकानुसार (ब्लू फ्लॅग स्टँडर्डस) नुसार विकसित केली जाणार असून त्यामुळे पर्यटकांना  जास्त आनंददायी अनुभव घेता येणार आहे. या तेरा बंदरात महाराष्ट्रातील चिवला व भोगवे या दोन बंदरांचा समावेश करण्यात आला आहे.

या शिवाय  गोवा, पुडुचेरी,दमण व दीव, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार येथील प्रत्येकी एकेका बेटाचा ब्लू फ्लॅग बीच म्हणून विकास केला जाणार आहे. ओदिशातील कोणार्क किनाऱ्यावरील चंद्रभागा बंदराला ५ जूनला पर्यावरण दिनी गौरवण्यात येणार आहे. या बंदराने ब्लू फ्लॅग बीच निकष पूर्ण केले आहेत. ही सगळी बंदरे भारतातच नव्हे तर आशियातील पहिली असणार आहेत. सोसायटी फॉर इंटिग्रेटेड कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेच्यावतीने भारतीय बंदरे विकसित केली जातात. या प्रकल्पाचे प्रमुख अरविंद नौटियाल यांनी सांगितले की, ही बंदरे पर्यटक स्नेही केली जाणार असून तेथे स्वच्छता, प्लास्टिक मुक्ती यावर भर दिला जाणार आहे. तेथे कचरा व्यवस्थापन प्रणालीही बसवण्यात येणार आहे. या बंदरांना पर्यावरण व पर्यटन विषयक तेहतीस निकष पूर्ण करावे लागणार आहेत. ब्लू फ्लॅग बीच मानके १९८५ मध्ये कोपनहेगनच्या फाऊंडेशन फॉर एनव्हरॉनमेंटल एज्युकेशन या संस्थेने त्यार केली आहेत. यात मत्स्य अधिवास सुरक्षित करतानाच प्रदूषणाला आळा घालणे, पर्यटक सुविधांना प्राधान्य देणे हे निकष महत्त्वाचे आहेत.