गेम मोबाइल किंवा संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येत असल्याने अडचण

ब्लू व्हेल चॅलेंज या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली असली, तरी तसे करणे शक्य नाही, असे मत इंटरनेट तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र विधानसभा व संसदेतही या गेमवर बंदी घालण्याची व तो संकेतस्थळावरून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. पण हा गेम मोबाइल किंवा संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतो त्यामुळे त्यावर बंदी घालणे शक्य नाही, असे ‘सेंटर ऑफ इंटरनेट अँड सोसायटी’ या संस्थेचे उद्भव तिवारी यांनी सांगितले. या गेमसाठी कुठले एक संकेतस्थळ नाही. त्यामुळे सगळ्या इंटरनेटवरच बंदी घातली तर हा गेम रोखता येईल पण ते अशक्य आहे. या गेमचा प्लेस्टोअरवर किंवा संकेतस्थळांवर शोध घेतला, तो सापडत नाही, त्यासाठी त्याचे निर्माते संभाव्य वापरकर्त्यांशी संपर्क साधतात. अ‍ॅनिमेटेड व्हेल मासा अडथळे पार करीत जातो, असा एक मुलांचा गेम आहे. दुसरा ब्लू व्हेल चॅलेंज गेम हा आताच्या नकारात्मक गेमला पर्याय म्हणून तयार करण्यात आला आहे, त्यात प्रेरणात्मक कार्यात सहभागास उत्तेजन दिले जाते. त्यांत सहभागकर्त्यांना तुमचे जीवन अमूल्य आहे, असा संदेश दिला जातो. घातक असलेला ब्लू व्हेल गेम ५० दिवसांच्या आव्हानांचा असून तो रशियात तयार झाला. त्यात १३० जणांनी रशियात प्राण गमावले. मुंबईच्या मनप्रीत सहानी याने ३० जुलैला सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. तो ब्लू व्हेलचा भारतातील पहिला बळी होता. या गेमचे प्रशासक हे विविध ऑनलाइन मंच वापरून मुलांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचतात. त्यात इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप व इतर मंचांचा समावेश आहे, असे तिवारी यांनी सांगितले.

ब्लू व्हेलपासून वाचण्यासाठी..

इन्स्टाग्राम व फेसबुक यांनी आता ब्लू व्हेल गेम विरोधात उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार या गेमचा हॅशटॅग आला तर वापरकर्त्यांला हेल्प पेजकडे नेले जाईल, त्यात टॉक टू अ फ्रेंड, काँटॅक्ट हेल्पलाइन व गेट टिप्स अँड सपोर्ट हे पर्याय दिले आहेत. त्यातून या गेमच्या धोक्यातून आपण बाहेर पडतो. या शिवाय पालकांनी मुले इंटरनेटवर काय सर्च करतात, यावर ऑनलाइन साधनांच्या मदतीने लक्ष ठेवण्याची गरज आहे. या गेमची निर्मिती रशियाचा बावीस वर्षीय तरुण फिलीप बुडेकिन याने केली असून त्याला गेल्या नोव्हेंबरमध्ये अटक केली आहे. ज्या लोकांची जगण्याची लायकी नाही, त्यांना जगातून घालवण्याचा हेतू या चॅलेंज गेममध्ये आहे, असे त्याने सांगितले होते.