‘ब्लू व्हेल’ या गेममुळे वर्षभरात अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशात या वर्षाला निरोप देतानाही अशीच एक घटना उघडकीस आली आहे. हैदराबाद येथील एका १९ वर्षांच्या प्लास्टिकची पिशवी गळ्याभोवती बांधून आत्महत्या केली आहे. हैदराबाद येथे राहणाऱ्या या तरूणाचे नाव टी. वरूण असे आहे. त्याने आपल्या चेहऱ्याभोवती प्लास्टिकची पिशवी करकचून बांधली आणि त्याचमुळे गुदमरून त्याचा जीव गेला. त्याच्या वडिलांनी ही घटना पोलिसांना सांगितली. ज्यानंतर पोलिसांनी ही माहिती दिली. ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ या गेममुळेच त्याने जीव दिला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

वरूण शांत स्वभावाचा मुलगा होता. तसेच तो अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. मात्र त्याने ज्या प्रकारे आत्महत्या केली त्यावरून हा मुलगा ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ हा गेम खेळत असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या मुलाचा लॅपटॉप आम्ही ताब्यात घेतला आहे तो फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वीच हैदराबाद पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाने ‘ब्लू व्हेल’ गेमचे तोटे काय आहेत हे सांगणारे एक पत्रक जारी केले होते. तसेच शैक्षणिक संस्थांमध्येही या गेमचे अपाय काय असू शकतात हे सांगितले होते. अशात आता एका मुलाचा मृत्यू या गेममुळेच झाल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे.

यावर्षीच्याच जुलै महिन्यात मनप्रीत सिंग या चौदा वर्षांच्या मुलाने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. मनप्रीत सिंग हा मुंबई आणि भारतातला ‘ब्लू व्हेल’च्या आहारी जाऊन आत्महत्या करणारा पहिला मुलगा होता. त्यानंतर देशात अशा अनेक घटना घडल्या ज्यामध्ये ‘ब्लू व्हेल’ गेममुळे मुलांनी किंवा मुलींनी आत्महत्या केल्या. वर्ष संपतानाही अशाच प्रकारची बातमी समोर आली आहे. या खेळाचे लोण जगात सर्वात आधी रशियामध्ये पसरले. ‘ब्लू व्हेल’ या गेममुळे रशियात १०० पेक्षा जास्त मुलांनी जीव दिला. तर चीन, जपान या देशांमध्ये या खेळाचे लोण पसरले आहे.