‘ब्लू व्हेल’ या गेममुळे आता एमबीए करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होतो आहे. पुद्दुचेरी विद्यापिठाच्या वसतिगृहाशेजारी असलेल्या एका झाडाच्या फांदीला गळफास लावून घेत या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. शशीकुमार बोरा असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. शशीकुमार बोरा हा मूळचा होता आणि तो  एमबीएच्या पहिल्या वर्षाला शिकत होता.

झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतला शशीकुमारचा मृतदेह पाहून पुद्दुचेरी विद्यापिठाने कालापेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत, हा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

प्राथमिक तपासानंतर  शशीकुमारचा मृत्यू ब्लू व्हेल या गेममुळे झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ब्लू व्हेल हा अँड्रॉईड बेस्ड गेम आहे. या गेमची सुरूवात रशियात झाली आहे. गुरूवारीच मदुराई येथे राहणाऱ्या एका मुलानेही ब्लू व्हेल या गेमच्या टास्क पूर्ण करताना आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. आता पुद्दुचेरी विद्यापिठात शिकणाऱ्या शशीकुमार बोरा या विद्यार्थ्यानेही आत्महत्या केली आहे, यामागचे कारणही ब्लू व्हेल असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नेमका आहे तरी काय आहे हा ब्लू व्हेल गेम?
ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये प्रत्येक प्लेयरला एक मास्टर मिळतो
अँड्रॉईडवरून हा गेम एकदा डाऊनलोड केला की डिलिट करता येत नाही.
रक्तानं ब्लू व्हेल कोरणे, भीतीदायक सिनेमा पाहणं असे टास्क दिले जातात
गेमचा मास्टर ५० दिवस प्लेयरवर नियंत्रण ठेवतो आणि सगळे टास्क पूर्ण करायला भाग पाडतो
हा गेम एकूण ५० लेव्हल्सचा आहे, यातील ५० वी लेव्हल आत्महत्या करणे आहे.

ब्लू व्हेल या खेळामुळे चीनमध्ये आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. रशियातून या खेळाचे लोण जगभरात पसरताना दिसते आहे रशियात या गेममुळे २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

१२ ते १६ या वयोगटातील मुलांकडे असलेल्या स्मार्ट फोनमध्ये हा गेम डाऊनलोड करण्याचे प्रमाण आणि या गेममुळे त्यांच्या आत्महत्या होण्याचं प्रमाण जास्त आहे. मुंबईत मनप्रीत नावाच्या एका विद्यार्थ्याने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती त्यानंतर देशभरात या गेममुळे आत्महत्या केल्याच्या पाच ते सहा घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत.