अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला लवकरच सुरुवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. यासाठी ५ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत तयारी सुरू झालेली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी छत्तीसगडमधील एक मुस्लीम भाविक ८०० किलोमीटरचा प्रवास करुन अयोध्या येथील सोहळ्यास हजर राहणार आहे. मोहम्मद फैज खान असं या भाविकाचं नाव असून तो छत्तीसगडमधील चांदखुरी गावातला रहिवासी आहे. भगवान श्रीराम यांची आई कौसल्या यांचं जन्मस्थान म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे.

आणखी वाचा- राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम घरातूनच पाहता येणार

एखाद्या मंदिराला भेट देण्यासाठी इतका मोठा प्रवास करण्याची ही आपली पहिली वेळ नसल्याचंही मोहम्मद फैज खानने सांगितलं. मी आतापर्यंत देशातील विविध मंदिर आणि मठांमध्ये राहून आलोय, अंदाजे १५ हजार किलोमीटरचा प्रवास केलाय. मला कधीही धर्मामुळे कोणतीही समस्या जाणवली नाही. आताचा प्रवास तर फक्त ८०० किलोमीटरचा आहे.” मोहम्मद खान ANI वृत्तसंस्थेशी बोलत होता. या सोहळ्यासाठी मोहम्मदने आपल्या गावातली माती आणली आहे, सध्या तो मध्य प्रदेशातील अनुपूरपर्यंत पोहचला आहे.

आणखी वाचा- अयोध्येतील राम मंदिराच्या दोन हजार फूट खाली ठेवली जाणार ‘टाईम कॅप्सूल’

आपण धर्माने मुसलमान असलो तरीही आपले पूर्वज हिंदू असल्याचं मोहम्मद खानने सांगितलं. “मी रामाचा मोठा भक्त आहे. जरीही मी मशिदीत जात असलो तरीही माझे पूर्वज हे हिंदूच होते.” राम मंदिराच्या निर्माणावरुन देशात अनेक राजकीय वादळं आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेरीस राम मंदिर निर्माणासाठी ट्रस्टची स्थापना झाली असून ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष तयारी सुरु झाली आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी संगम अर्थात गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम असलेल्या ठिकाणाची माती अयोध्येत आणण्यात येणार आहे. तसेच, गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी १२८ फूट इतकी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडानं बनवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता ५ कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत.