विद्युतपुरवठय़ाअभावी मुंबईमधील सार्वजनिक शौचालयांचा वापर करणे शक्य होत नाही. त्यामुळे महिला, लहान मुलांची प्रचंड कुचंबणा होते. ही बाब ओळखून सार्वजनिक शौचालयांमध्ये विद्युतपुरवठा व विद्युत व्यवस्था, देखभाल, साफसफाई आदी सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले.
मेहता यांनी गेल्या आठवडय़ात पालिका उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांची बैठक घेतली. या बैठकीत सार्वजनिक शौचालयांच्या स्थितीबाबत आयुक्तांनी चिंता व्यक्त केली. महापालिका, म्हाडा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार आदींनी सुमारे ८,४१७ सार्वजनिक शौचालये बांधली असून त्यामध्ये ७९,७५८ शौचकूपे आहेत. या शौचालयात वीजपुरवठय़ाची सुविधा नाही. त्यामुळे नागरिकांना या शौचालयांमध्ये जाता येत नाही. या शौचालयांमध्ये विद्युतपुरवठा उपलब्ध करण्याची जबाबदारी पालिकेनेच स्वीकारली आहे.

स्वच्छता राखण्याचे आदेश
अस्वच्छतेमुळे शौचालयात जाणे अवघड होते. त्यामुळे या शौचालयांमध्ये नियमित स्वच्छता राखण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. सार्वजनिक शौचालयांमध्ये नळजोडणीसह सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी. सविस्तर परिपत्रक व मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात, असे आदेश मेहता यांनी दिले.