लग्नानंतर परदेशात हनिमूनला जाण्याची स्वप्ने रंगवणाऱ्या विस्मय शाहला गुजरात उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणात दोषी ठरलेल्या विस्मय शाहने परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट नूतनीकरणारची परवानगी मागितली होती. कोर्टाने पासपोर्ट नूतनीकरणाची विनंती मान्य केली पण पासपोर्ट त्याच्या ताब्यात देण्यास नकार दिला. त्यामुळे विस्मयचे परदेशात हनिमूनला जाण्याचे स्वप्न भंगले आहे.

भारतातही अनेक चांगली ठिकाणं आहेत तिथे हनिमूनला जाऊ शकतोस असे कोर्टाने त्याला सांगितले. विस्मय शाह १३ डिसेंबरला विवाहबद्ध झाला. त्याला हनिमूनसाठी परदेशात जायचे होते. मागच्या पाच वर्षांपासून विस्मय शाहचा पासपोर्ट सत्र न्यायालयाच्या ताब्यात आहे. शाहच्या वकिलाने पासपोर्ट नूतनीकरणासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली होती. हनिमूनसाठी कुठे जाणार त्याबद्दल सुद्धा माहिती दिली होती.

भारतात अनेक चांगली पर्यटन स्थळ आहेत. विस्मय शाह तिथे जाऊन आनंद घेऊ शकतो. हनिमूनसाठी देशाबाहेर जाण्याची गरज नाही असे न्यायाधीश सोनिया गोकानी यांनी सांगितले. न्यायाधीश गोकानी यांनी शाहच्या पासपोर्ट नूतनीकरणाचे आदेश दिले असले तरी ते पासपोर्ट विस्मय शाहला मिळणार नाही.

शाहचा पासपोर्ट नूतीनकरण झाल्यानंतर पुन्हा सत्र न्यायालयात जमा करण्याचे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने दिला आहे. शाहला पासपोर्ट द्यायचा की, नाही याचा निर्णय भविष्यात घेऊ असे कोर्टाने सांगितले. २४ फेब्रुवारी २०१३ रोजी विस्मय शाहच्या भरधाव बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्याला २०१५ साली सत्र न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला.