गेल्या अनेक वर्षांपासून लष्कराला आधुनिक शस्त्रास्त्रांची आवश्यकता आहे. मोठ्या विलंबानंतर अखेर केंद्र सरकारने भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी आधुनिक रायफल्स, लाइट मशीन गन आणि क्लोजक्वार्टर बॅटल कार्बाइन्स उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. जलदगती प्रक्रियेतंर्गत (एफटीपी) ही शस्त्रास्त्रे पुरवली जाणार आहेत. संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारीच निवडलेल्या विदेश कंपन्यांना ७२,४०० असॉल्ट रायफल्स, १६,४७९ एलएमजी आणि ९३,८९५ सीक्यूबी कार्बाइन्ससाठी निविदा देण्यात आली आहे. सुमारे ५,३६६ कोटी रूपयांचा हा व्यवहार असल्याचे सांगण्यात येते.

दहा दिवसांच्या आत हा करार निश्चित केला जाणार आहे. येत्या वर्षभरात ही शस्त्रास्त्रे भारताला सोपवली जातील अशी अपेक्षा केली जात आहे. सन २००५ मध्येच लष्कराने ३८२ बटालियन्ससाठी सीक्यूबी कार्बाइन्सची मागणी केली होती. याच्या प्रत्येकात ८५० सैनिक आहेत. सन २००९ मध्येच लाइट मशीन गनचे प्रकरण सुरू झाले होते. पण काही तांत्रिक मापदंडामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.

एफटीपीच्या मार्गानेच लष्कराला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवली जाऊ शकतात. सध्या ५.५६ एमएम इन्सासची जागा घेण्यासाठी ८.१६ लाख नवीन ७.६२x५१एमएम कॅलिबर असॉल्ट रायफल्सची आवश्यकता आहे. याच पद्धतीने लष्कराला ४.५८ क्वार्टर बॅटल कार्बाइन्स आणि ४३,५४४ लाइट मशीन गन्सची आवश्यकता आहे. यामध्ये बहुतांश शस्त्रास्त्रे ही लष्करासाठी तर काही नौदल आणि वायूदलालाही दिली जाणार आहेत.