अमेरिकेतील लुईझियाना प्रांताचे गव्हर्नर व रिपब्लिकन पक्षाचे भारतीय-अमेरिकी वंशाचे प्रभावशाली नेते बॉबी जिंदाल यांनी २०१६ मध्ये अध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे, अशी माहिती त्यांच्याच राज्यातील वरिष्ठ सिनेटरने सोमवारी  दिली.
सी-स्पॅन या अमेरिकी वाहिनीच्या न्यूजमेकर या कार्यक्रमात सिनेटर डेव्हिड व्हिटर यांनी सांगितले, की आपल्या मते बॉबी जिंदाल हे २०१६च्या अध्यक्षीय निवडणुकीत महत्त्वाचे उमेदवार असतील. बॉबी जिंदाल यांच्या नेतृत्वाचा आपण आदर करतो. त्यांच्या राजकीय मूल्यांचा आदर करतो, पण आपण पुढे व्यक्तिगत पातळीवर नेमके काय करणार हे निश्चित केलेले नाही.
जिंदाल (वय ४२) हे पुढील अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवार असतील असे तुम्हाला वाटते काय, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की ते अध्यक्षपदाची पुढची निवडणूक लढवतील असे वाटते.
जिंदाल यांच्या लुईझियानाच्या गव्हर्नरपदाची दुसरी मुदत २०१५ मध्ये संपत आहे, त्यामुळे ते तिसऱ्यांदा गव्हर्नरपदाची निवडणूक लढवू शकत नाहीत असे व्हिटर यांनी सांगितले.
जिंदाल यांनी यापूर्वीही २०१६ मधील अध्यक्षीय निवडणूक लढवण्याची शक्यता फेटाळलेली नाही. जानेवारीत त्यांच्या उमेदवारीबाबत निश्चित काहीतरी सांगता येईल असेही ते म्हणाले.