बिहारमधील बोधगया येथे २०१३ मध्ये घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
बिहारमधील महाबोधी मंदिराच्या परिसरात जुलै २०१३ मध्ये नऊ बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये पाच जण जखमी झाले होते. या स्फोटांप्रकरणी गेल्या आठवड्यात पाटणा येथील एनआयए विशेष न्यायालयाने पाच दहशतवाद्यांना दोषी ठरवले होते. इम्तियाज अन्सारी, हैदर अली, मुजीबउल्लाह, ओमर सिद्दीकी आणि अजरुद्दीन कुरेशी अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. म्यानमारमध्ये मुस्लिमांवर झालेल्या अत्याचाराविरोधात हे स्फोट घडवण्यात आले होते. दोषी दहशतवाद्यांच्या शिक्षेसंदर्भात शुक्रवारी न्यायालयाने निर्णय दिला. न्यायालयाने पाचही दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 1, 2018 12:47 pm