बोधगयामधील महाबोधी मंदिरात रविवारी पहाटे झालेल्या स्फोटांमध्ये अमोनियम नाईट्रेट आणि सल्फरचा वापर करण्यात आला होता, अशी माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली. हल्लेखोरांनी ही स्फोटके छोट्या छोट्या सिलिंडर्समध्ये ठेवली होती, असेही दिसून आले.
स्फोटांनंतर एनएसजीच्या पथकाने घटनास्थळावरून जप्त केलेल्या पुराव्यांच्या आधारे तयार करण्यात आलेला अहवाल सोमवारी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. याच अहवालात वरील माहिती देण्यात आली आहे. स्फोटांसाठी इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाईसचा वापर करण्यात आला आणि टायमरच्या साह्याने हे स्फोट घडवून आणण्यात आले, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मंदिर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी अमोनियम नाइट्रेट, सल्फरमध्ये अन्य काही स्फोटक घटकही ठेवण्यात आले होते, अशीही माहिती एनएसजीने अहवालात दिली आहे.
दरम्यान, महाबोधी मंदिरात एकूण १३ बॉम्ब ठेवण्यात आले होते. त्यापैकी दहा बॉम्बचा स्फोट झाला, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांना दिली.