एकीकडे करोनाने देशभरात घातलेलं थैमान अद्यापही नियंत्रणात नसताना कर्नाटकमधील बल्लारी येथील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत करोनाबाधित रुग्णांचे मृतदेह खड्ड्यात फेकून दिले जात असल्याचं दिसत आहे. एकूण आठ मृतदेह एकाच खड्ड्यात फेकून देण्यात आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत सहा लोक पीपीई किट घालून मृतदेह एका मोठ्या खड्ड्यात फेकून देत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. ही स्मशानभूमीची जागा असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी लोक स्थानिक भाषेत मृतदेह कशा पद्दतीने फेकायचे हेदेखील सांगत आहेत. यावेळी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सर्व मृतदेह खड्ड्यात टाकून बंद करुयात असं सांगताना ऐकू येत आहे. तर दुसरी व्यक्ती त्यावर, ‘हो, आधी खड्डा बुजवूयात” असं सांगत आहे.

काही वेळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यानंतर उपायुक्त एस एस नकूल यांनी मंगळवारी बिनशर्त माफा मागितली. ज्या पद्धतीने मृतदेहांना वागणूक देण्यात आली ते पाहून आपण प्रचंड नाराज आणि दुखी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

“सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी बल्लारीच्या अतिरिक्त उपायुक्त यांच्या देखरेखेखाली चौकशी करण्यात आली. यावेळी हा व्हिडीओ बल्लारी येथील असल्याचं समोर आलं असून हे सर्व करोनाबाधित रुग्णांचे मृतदेह होते,” अशी माहिती स्टेटमेंट जारी करत देण्यात आली आहे.

यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाला या घटनेबद्दल खेद असून बल्लारीचे लोक आणि मृतदेहांच्या कुटुबीयांची बिनशर्त माफी माफी मागत असल्याचंही सांगण्यात आलं आहे. उपायुक्तांनी घटनेत सहभागी संपूर्ण टीमवर कारवाई करण्यात आलेली असून त्याजागी योग्य प्रशिक्षण असलेली नवी टीम आणण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.