फिलिपाइन्स आणि नॉर्वेचे राजदूत आणि इंडोनेशिया आणि मलेशियाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची पत्नी यांचे मृतदेह शनिवारी अपघात स्थळावरून येथे आणण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगित-बाल्टिस्तान येथे हेलिकॉप्टरने पेट घेतल्याने ते कोसळले होते.
लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर शुक्रवारी नतलर खोऱ्यात कोसळले त्यामध्ये लष्कराचे दोन वैमानिक आणि एक कर्मचारीही ठार झाला. या दुर्घटनेतील सात जणांचे मृतदेह गिलगित-बाल्टिस्तान येथून आणण्यात आल्याचे पाकिस्तान टेलिव्हिजनवर दाखविण्यात आले. रावळपिंडीतील मूर खान हवाई तळावर मृतदेह आणण्यात आले.
या दुर्घटनेत पोलंडचे राजदूत अ‍ॅण्ड्रेज अनानिक्झ आणि त्यांची पत्नी, डच राजदूत मार्सेल डी विंक आणि मलेशियाचे उच्चायुक्तही जखमी झाले असून त्यांना सी-१३० विमानाने आणण्यात आले. इंडोनेशियाचे राजदूत बुरहान मोहम्मद हे ७५ टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
तालिबानने सदर हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला असून पंतप्रधान नवाझ शरीफ हे आमचे लक्ष्य होते असे म्हटले आहे. मात्र पाकिस्तान सरकारने या दाव्याचे खंडन केले आहे. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर कोसळले, असे प्राथमिक चौकशीत आढळल्याचे सरकारने सांगितले.