तामिळनाडूतील चेन्नईमधील हुलामीडू येथील राहत्या घरातून बेपत्ता झालेली नर्स आर. इलवीझहीची हत्या झाल्याचे समोर आले आहे. मागच्या बारा दिवसांपासून ही नर्स बेपत्ता होती. पोलिसांनी या हत्ये प्रकरणी इलवीझहीच्या मैत्रिणीच्या नवऱ्याला अटक केली आहे. अजित कुमार असे आरोपीचे नाव असून तो इलवीझहीची मैत्रिण महालक्ष्मीचा नवरा आहे. पैशांसाठी अजित कुमारने इलवीझहीची गळा आवळून हत्या केली. इलवीझहीला मारल्यानंतर त्याने तिच्या अंगावरची १२ ग्रॅमची सोन्याची चैन, चांदीचे पैजण आणि एक मोबाइल फोन चोरला.

हा चोरीचा ऐवज विकून त्यातून येणा-या पैशातून पत्नी महालक्ष्मीला बर्थ डे गिफ्ट घेण्याचा अजित कुमारचा प्लान होता. इलवीझहीचे बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे वडिल राजेंद्रन यांनी दाखल केली होती. इलवीझही घरगुती आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या संस्थेमध्ये नर्समध्ये नोकरी करत होती. इलवीझही सतत फोनवर बोलत असायची. ती तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली असावी असे सांगून अजित कुमारने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे त्याच्यावरचा संशय अधिक बळावला. तीन महिन्यांपूर्वी अजित पल्लकडहून चेन्नईला आला. त्याची पत्नी महालक्ष्मी आणि इलवीझही नोकरी करत असलेल्या संस्थेमध्येच तो ड्रायव्हर म्हणून नोकरीला राहिला. हत्येच्या महिनाभरआधी अजितने नोकरी सोडली. दुसऱ्या ठिकाणी आपल्याला नोकरी लागली असे त्याने पत्नीला खोटे सांगितले. ज्यावेळी महालक्ष्मीने त्याच्याकडे नवीन ठिकाणचा महिन्याचा पगार मागितला. तेव्हा त्याने इलवीझहीकडून पैसे उधारीवर घेण्याचे ठरवले. ६ एप्रिलला सकाळी १० वाजता तो इलवीझहीच्या घरी गेला व तिच्याकडे पैसे मागितले. त्यानंतर कर्ज काढण्यासाठी तुझी सोन्याची चैन मिळेल का ? अशी त्याने विचारणा केली.

पण इलवीहहीने त्याला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या अजितने ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह एका गोणत्यात भरला व गाडीने कोयामबीडू येथे निर्जन स्थळी नेऊन फेकला. अजित ६ एप्रिलला इलवीझहीच्या घरी गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते. पोलिसांनी तोच धागा पकडून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.